डोंबिवली: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी त्यांच्या परीक्षा केंद्रावर सोडायचे असल्यास अशा विद्यार्थ्यांनी हात दाखवा रिक्षा थांबवा हा विनामूल्य उपक्रम भाजपचे माजी नगरसेवक विनोद काळण यांनी यंदाही राबवला आहे.
यंदा त्यांच्या या उपक्रमाचे सातवे वर्ष आसून दहावी, बारावीला परीक्षेला जाताना विद्यार्थी तणावात असतात, अशावेळेस त्यांना अनेकदा काही सुचत नाही. काहींची आर्थिक स्थिती बेताची असते, पण बोर्डाचे केंद्र लांब आलेले असते अशावेळी अनेकदा विद्यार्थी घरच्यांना त्रास नको व्हायला म्हणून पायी केंद्रावर जातात. ऊन वाढते असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांची ही कुचंबणा लक्षात घेऊन काळण यांनी ही सुविधा दिली आहे. साईश प्लाझा आजदे गाव, आजदे पाडा, ओमकार नगर या ठिकाणाहून त्या रिक्षा उपलब्ध आहेत. सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत ते ही सेवा पूरवत असल्याचे सांगण्यात आले. सात वर्षात शेकडो विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. शहरात अन्यत्र देखील काही सामाजिक कार्यकर्ते आपणहून असे कार्य करतात. बहुतांशी रिक्षा स्टँडवर देखील अशी सुवीधा असून शालांत परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडवू नका , त्यांनी पैसे दिले तरी ठीक नाही दिले तरी त्यांना काही बोलू नका आदी सूचना रिक्षा चालक मालक संघटना, भाजप जिल्हा वाहतूक सेलचे अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी रिक्षा चालकांना दिल्या आहेत. दरवर्षी लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमासकर, पश्चिमेला रिक्षा चालक मालक युनियनचे उपाध्यक्ष शेखर जोशी देखील ही सेवा करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होतो.