डोंबिवली: दिवा-कोपर दरम्यान धावत्या लोकलमध्ये पडून एका २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. रिया श्यामजी राजगोर असं या तरुणीचं नाव आहे. ठाण्याला एका खासगी कंपनीत सकाळी गर्दीच्या वेळेत नेहमीप्रमाणे नोकरीला जाण्यासाठी ती निघाली असल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी दिली. येथून लाखोंच्या संख्येने नोकरदार वर्ग मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. सकाळी ७ ते १० या वेळेत सर्वच लोकल प्रवाशांनी खच्चून भरलेल्या असतात.
कर्जत-कसाराहून येणाऱ्या लोकलमध्ये तर डोंबिवलीकराना चढायला मिळत नाही. त्याशिवाय डोंबिवली ते सीएसएमटी लोकलचं प्रमाणही कमी असल्याने वेळेत निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रवासी गर्दीतून प्रवास करतात. रियानेही अशीच जोखीम पत्करली आणि तिला जीव गमवावा लागल्याची प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहे. लोकलमधील वाढणारी गर्दी ही मुंबईकरांसमोरील मोठी समस्या आहे.
नोकरीसाठी दररोजचा प्रवास अपरिहार्य असल्याने धक्काबुक्की करीत, कधी दाराला लटकत उभं राहून चाकरमान्यांना प्रवास करावा लागतो. मुंबई उपनगरातून मोठ्या संख्येने लोक मुंबईत नोकरीसाठी येत असतात. दररोज लाखो लोक लोकलच्या गर्दीत प्रवास करीत आपलं घरं, कार्यालयं गाठत असतात. आतापर्यंत लोकलमध्ये लटकत राहून प्रवास करणाऱ्यांपैकी अनेकांचा अपघात झाला आहे. रियाच्या पश्चात आई, वडील असून मृतदेह वारसांकडे दिल्याची माहिती दिली