डोंबिवली: येथील म्हात्रेनगरमध्ये सीसी रस्त्यांची कामे सुरू असून त्यापैकी राजाजी पथ येथून कोपर रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता खचल्याने त्या रस्त्याच्या सीसीचे काम रखडले आहे. तसेच अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली असून नागरिकांना सतर्क करण्यासाठी जिथे भगदाड पडले आहे त्या ठिकाणी लोखंडी बाकडे टाकण्यात आले आहे.हा रस्ता शुक्रवारी खचल्याचे प्रभाग नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी तातडीने मनपा अधिकाऱ्यांना सतर्क केले असून बुधवारपासून तेथील डागडुजीच्या कामाला सुरुवात होईल असे आश्वासन त्याना देण्यात आले होते. यासंदर्भात दीड महिन्यांपूर्वी मनपाचे कार्यकारी अभियंता अनंत मतगुंडी याना अवगत केले होते, पण तरीही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त केली.ते म्हणाले।की प्रभागात तत्कालीन स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी प्रभागाच्या विकास कामांसाठीसाठी १करोडचा निधी मंजूर केला होता, त्यानुसार या प्रभागात एका मुख्य रस्त्यासह अंतर्गत तीन रस्ते असे एकूण ५०० मीटरमध्ये ४ रस्त्यांचे सीसी काम करण्याचे नियोजन होते. त्यापैकी कचरू भुवन ते जय शारदा, कोपर ते सुदामा, सर्वोदय ते ज्ञानेश्वर भुवन असे तीन रस्त्यांचे सीसी काम झाले आहे. त्यानुसार आता राजाजी पथ ते कोपर हा मुख्य रस्ता सीसी करण्याचे काम गेल्या आठवड्यात हाती घेण्यात होणार होते. पण त्या दरम्यान रस्ता खचल्याने ड्रेनेज संदर्भात काम मनपाने केल्यानंतर भरणी केली जाईल, त्यानंतरच कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रस्त्याचे काम आता कधी सुरू होईल हे आताच सांगता येत नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या ठिकाणी ड्रेनेजचे काम हे १९८५ दरम्यान जेव्हा रस्ते झाले तेव्हा झाले असल्याची माहिती जुन्या रहिवाश्यानी दिली. येथे ४२ वर्षे राहणारे उदय मुकुंद जोशी यांनी सांगितले की, त्यावेळी जे ड्रेनेज काम झाले त्यानंतर आतापर्यंत काहिही झाले नव्हते, त्यावेळी प्रभागाच्या रहिवाश्यांच्या तुलनेत आता ३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आता या प्रभागात १३५ मोठ्या इमारती, ३५ पागडीच्या इमारती, साईनाथ वाडी वस्ती असून चाळींचा भाग अल्प आहे. या भागातून हाकेच्या अंतरावर कोपर रेल्वे स्थानक असून दाट वर्दळीचा हा भाग आहे. आता ड्रेनेजचे काम झाले तर त्यांतनंतरच सीसी रस्त्याचे काम हाती घ्यावे अशी प्रतिक्रिया जोशी यांनी दिली.
डोंबिवलीतील म्हात्रेनगरमध्ये रस्ता खचला पडले भगदाड : सीसी रस्त्याचे काम रखडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 2:47 PM