अनिकेत घमंडी, डोंबिवली: येथील एमआयडीसी निवासी भागात रस्त्यांचे काँक्रीटीकरण काम चालू आहे. अनेक रस्त्यांची कामे पुरी झाली आहेत. परंतु आता त्या रस्त्यांना भेगा, तडे पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे काँक्रिट रस्ते काही महिन्यातच खराब होण्याची भीती दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी व्यक्त केली आहे.
त्या रस्त्यावरून जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने हे तडे, भेगा आणखी वाढवू शकतात. ती बाब ही एमएमआरडीएचा ठेकेदाराला दाखविण्यात आली असून त्यांच्याकडून ताबडतोब योग्य ती दुरुस्ती/देखभाल कार्यवाही होणे जरुरी आहे. ममता हॉस्पिटल रोडवर सद्या काँक्रीटीकरण काम सुरू असताना तेथे नुकत्याच बनविलेल्या काँक्रिट रस्त्याला तडे, भेगा गेल्याने सदर रस्त्यांच्या दर्जा बद्दल प्रश्न निर्माण झाला आहे. मिलापनगर/सुदर्शननगर मधील बनविलेल्या अंतर्गत रस्त्यावरही तडे, भेगा पडल्याचे दिसून येत आहे. शिवाय जे रस्ते तयार झाले आहेत त्या काँक्रिट रस्त्यांचा जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या मधोमध जी एक फुटाची पोकळी (Gap) राहते तेथे सिमेंट/काँक्रिट भरण्यात आले आहे त्या काही ठिकाणी लेव्हल नसल्याचे ते ओबडधोबड काम केल्याचे दिसत आहे. एमआयडीसी कडून सांडपाणी वाहिन्या टाकण्यात येणार असल्याने काँक्रिट रस्त्यांचा बाजूला पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम आता थांबविण्यात आले आहे. त्यामुळे तेथे माती, राडारोडा पडलेल्या स्थितीत असल्याने नागरिकांना चालणे मुश्किल झाले आहे. शिवाय त्याची धूळ उडत असल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदर या पूर्ण झालेल्या काँक्रिट रस्त्यांचे क्वालिटी ऑडिट केले तर त्यात हे दोष नक्कीच दाखविले जातील. एमएमआरडीएचे अधीक्षक/कार्यकारी अभियंता यांनी यात लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी अशी अपेक्षा येथील नागरिक व्यक्त करीत असल्याचे सांगण्यात आले.