लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : पूर्वेतील एमआयडीसीमधील निवासी भागातील महावितरणचे बहुतांशी रोहित्र अतिधोकादायक बनली आहेत. ते रस्ते व इमारतींच्या कडेला असून, बहुतेक ठिकाणी त्यांचे संरक्षक कुंपण तुटल्याने एखादे वाहन त्यावर धडकल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. तसेच झाडेझुडपे व परिसरात पडलेला कचरा याला आग लागल्यास अपघातही घडू शकतो, याकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे.
महावितरणने एमआयडीसीतील रोहित्र व त्यांच्या तांत्रिक कारणांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक वेळा रोहित्राला आग लागून स्फोट झाल्याचा घटना घडल्या आहेत. याबाबत वेळोवेळी पत्र देऊन, प्रत्यक्ष भेट घेऊन सांगूनही देखभाल होत नसल्याची खंत तेथील रहिवासी राजू नलावडे यांनी व्यक्त केली. नियमित साफसफाई, रोहित्रामधील ऑइल याची तपासणी योग्य वेळी झाली पाहिजे. रोहित्राला लागणारे किमती ऑइल रोहित्रामधून काढून चोरणारे समाजकंटक त्या ठिकाणी कुंपण नसल्याचा फायदा घेत असल्याचे ते म्हणाले. अशा अतिधोकादायक, देखभाल होत नसलेल्या रोहित्राची माहिती स्थानिक एमआयडीसी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी देऊनही त्यांच्याकडून कार्यवाही होताना दिसत नाही. काही वेळेस हे सर्व आमचा सिव्हिल खात्याकडे किंवा वरिष्ठांना पत्र देऊन कळवितो, असे महावितरणचे अधिकारी तोंडी सांगतात. मात्र, खरेच असे पत्र दिले आहे का, हे मात्र समजू शकलेले नसल्याचे ते म्हणाले.
वीजपुरवठा खंडित झाल्यास होते गैरसोयnसध्या उन्हाळा असल्याने वीज वितरणवर ताण येत आहे. आताही काही भागात तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित होत आहे. वाढत उष्मा, वर्क फ्रॉम होम तसेच काही जण कोरोनामुळे घरातच विलगीकरणात आहे. त्यात वीज नसल्यास नागरिक मेटकुटीला येतात. nएमआयडीसीतील रोहित्राच्या स्थितीबद्दल वारंवार महावितरणचा वरिष्ठ अभियंत्यांना फोटोसह समाजमाध्यमांवर, मोबाइलवर कळवण्यात येत असूनही कार्यवाही का होत नाही, याचे आश्चर्य वाटत असल्याचे नलावडे पुढे म्हणाले.