डोंबिवलीत काँग्रेस कार्यालयाचे छत कोसळले, कार्यालय फोडल्याचा आरोप; गुन्हा दाखल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 12:48 AM2021-12-20T00:48:19+5:302021-12-20T00:49:01+5:30
छत कोसळले की फोडले याबाबत संभ्रम असून कार्यालय फोडल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला आहे.
डोंबिवली- डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळ असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयाचे छत रविवारी कोसळल्याचे उघडकीस आले. छत कोसळले की फोडले याबाबत संभ्रम असून कार्यालय फोडल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला आहे. हे कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तिंवर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
हे कार्यालय 52 वर्ष जुने आहे. इमारतदेखील जूनी आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस पदाधिकारी संतोष केणे, नवेंदू पाठारे, अशोक कापडणे, वर्षा शिखरे, संजय पाटील, एकनाथ म्हात्रे यांनी कार्यालयाकडे धाव घेतली. या घटनेनंतर कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. ही घटना अत्यंत गंभीर असून तोडफोड करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी केल्याचे यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी संतोष केणे यांनी सांगितले.
कार्यालयाचे छत कोसळले की कार्यालय फोडले. यामागे नेमका काय हेतू असावा? यामागे कोणाचा हात आहे? कार्यालय तोडून कोणाला फायदा होणार आहे? याची सखोल चौकशी पोलिसांनी केल्यास वास्तविकता समोर येईल, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.