कल्याण : कल्याण ते डोंबिवली रिक्षाचे शेअर भाडे १५ रुपयांनी कमी करण्यात आले आहे. कोरोना काळात प्रति प्रवासी ५० रुपये भाडे आकारले जात होते. आता प्रती प्रवासी ३५ रुपये आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. कल्याण ते डोंबिवली हे अंतर सहा किलोमीटर आहे. या प्रवासाकरिता शेअर भाडे गेल्या मार्च महिन्यात प्रति प्रवासी २५ रुपये होते. लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय बंद होता. जून महिन्यात अनलॉकमध्ये रिक्षा अटींवर सुरू करण्यात आल्या. प्रत्येक रिक्षाचालकाने सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी तीन ऐवजी दोन प्रवासी घ्यायचे, असा नियम केला; मात्र प्रति प्रवासी भाडे किती आकारायचे, याचा कुठेही नियमावलीत उल्लेख नव्हता. प्रति प्रवासी २५ ऐवजी ५० रुपये शेअर भाडे आकारले जाऊ लागले. रेल्वेसेवा बंद असल्याने सामान्यांना भुर्दंड सहन करत प्रवास करणे भाग होते. रेल्वेसेवा सुरू झाली तरी ५० रुपये भाडे आकारले जात होते. हे भाडे कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. रिक्षाचालकांनी भाड्यात १५ रुपयांची कपात करून तशा आशयाचा फलक माहितीसाठी लावला आहे; मात्र आधीचे २५ रुपये शेअर भाडे पाहता सध्या १५ रुपये कपात करूनही प्रवाशाला १० रुपये जास्तीचेच भाडे द्यावे लागत आहे. आता रिक्षातून तीन प्रवासी घेऊन वाहतूक केली जात आहे. प्रति प्रवासी ३५ रुपये भाडे घेतले तरी एका फेरीला तीन प्रवाशांमागे रिक्षाचालकास १०५ रुपये मिळतात. २५ रुपयांचे ५० रुपये भाडे आकारण्यास आरटीओची परवानगी नव्हती. त्यामुळे रिक्षाचालकांचे फावले होते. आरटीओने या भाडेवाढीविरोधात कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे आजही प्रवाशांच्या माथी १० रुपयांची भाडेवाढ आहेच. आरटीओच्या म्हणण्यानुसार कल्याण क्षेत्रातील सर्व रिक्षा सीएनजीवर चालतात; मात्र काही रिक्षाचालकांनी आरटीओला सीएनजी बसविल्याचे सांगून रिक्षा पेट्रोलवर चालवित आहेत.
रिक्षाची अघोषित भाडेवाढ कमी करण्याची मागणीमहिन्याभरापूर्वी कॅम्प नंबर तीन ते कल्याण दरम्यानच्या प्रवासी भाड्यात पाच रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यापाठोपाठ कल्याण ते डोंबिवली दरम्यानच्या भाड्यात १५ रुपयांनी कपात झाली आहे. अघोषित भाडेवाढ कमी करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. त्यासाठी आरटीओने पुढाकार घेतला पाहिजे.