डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील बीएसयुपी प्रकल्प हा सुरवातीपासूनच वादग्रस्त चर्चेत राहिला आहे. आता यावरून सेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आक्रमक होताना दिसत आहेत. तर निवडणूकीच्या तोंडावर सत्ताधा-यांना आता बीएसयूपीच्या लाभार्थ्यांची आठवण झाली असा टोला भाजपाने लगावला आहे.
डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर परिसरातील बीएसयुपी प्रकल्पातील अनेक लाभार्थ्यांना घरे मिळाली नसल्याने शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु पालिका प्रशासने १५ दिवसात बैठक घेऊन निर्णय घेऊ असे लेखी आश्वासन दिल्यावर मोरे यांनी उपोषण मागे घेतले. .यासंदर्भात भाजप डोंबिवली पूर्व मंडल शहर सचिव मनोज पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. अचानक सेनेला लाभार्थ्यांची आठवण झाली.लाभार्थी इतके दिवस घरापासून वंचित होते तेव्हा शिवसेनेने का आवाज उठवला नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या लाभार्थ्यांना घरे मिळाली नाही तर उग्र आंदोलन करू असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
उपोषणाची हाक द्यायची आणि पालिकेने आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घ्यायचे हे न समजण्याइतके नागरिक भोळे नाहीत.लाभार्थ्यांना घरे मिळणे आवश्यक आहे. - मनोज पाटील, भाजप पदाधिकारी.