डोंबिवली: बारावीच्या परीक्षा नुकत्याच सुरू झाल्या असून येणारा महिना दीड महिना हा महत्वाच्या परीक्षांचा आहे,या काळात तरी उपनगरीय लोकल नियमित वेळा पत्रानुसार चालवा असे आवाहन उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार यांनी मध्य रेल्वे प्रशासनास केले आहे.
लोकल फेर्या नियमित नसल्याने विद्यार्थी व पालक आणि शिक्षक वर्गाला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. अनेकदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे दिसून येते. त्यामुळे या परीक्षांच्या काळात लोकल सेवा नियमित वेळेत असावी असा आग्रह विद्यार्थी आणि पालकांचा असतो. याबाबत अनेक शिक्षक आणि विद्यार्थी यांनी रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. महासंघाने मध्य रेल्वेच्या विभागीय परिचालन व्यवस्थापक यांना निदान परीक्षांच्या काळात तरी लोकल सेवा नियमित ठेवावी असे आवाहन केले आहे. कल्याण पासून पुढे मुंबईत लोकल सेवा विस्कळीत झाली तरी किमान रस्ते मार्गे परीक्षा स्थळ गाठणे शक्य होते. मात्र कल्याण कर्जत आणि कल्याण कसारा रेल्वे मार्गांची वाहतुक सुरळीत नसेल तर अन्य कोणतीही खासगी अथवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे परीक्षांच्या काळात कर्जत आणि कसारा मार्गावरील लोकल कोणत्याही परिस्थितीत वेळेत चालवा असे महासंघाने रेल्वे प्रशासनास बजावले आहे.
लोकल आधी मेल एक्स्प्रेस व मालगाडी पुढे काढण्यात येत असल्यामुळे कर्जत आणि कसारा मार्गावरील लोकल नेहमीच उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सोसावा लागतो. 12 वि आणि 10 वीच्या परीक्षांच्या काळात तरी रेल्वे प्रशासनाने असे प्रकार करू नये अशी अपेक्षा महासंघाने व्यक्त केली आहे. याबाबत शेलार यांनी बुधवारी मध्य रेल्वेचे विभागीय परिचालन व्यवस्थापक रामचंद्रन यांना फोनद्वारे सर्व परिस्थिती सांगून कसारा व कर्जत लोकल परीक्षा काळात वेळे वर चालविण्याची मागणी केली आहे.