Russia vs Ukraine War: युक्रेनमध्ये खाण्याअभावी आमच्या मुलांचे हाल, हवालदिल पालकांची आर्त हाक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 11:43 PM2022-02-28T23:43:19+5:302022-02-28T23:48:01+5:30
Russia vs Ukraine War: रशियाकडून अणूअस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिल्याने पालकांमध्ये भीती पसरली आहे. अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडल्याने पालक हवालदिल झाले आहेत
ठाणे - रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अजूनही काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून यामध्ये कल्याण डोंबिवलीती शहरातील 8 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. आमच्या मुलांना लवकरात लवकर भारतात आणा अशी आर्त साद या मुलांच्या पालकांनी दिली आहे.
रशियाकडून अणूअस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिल्याने पालकांमध्ये भीती पसरली आहे. अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडल्याने पालक हवालदिल झाले आहेत. ठाणे जिल्ह्यातील 54 विद्यार्थ्यांचाही समावेश असून ठाणे शहरातून सर्वाधिक म्हणजेच 22 विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. तर त्यापाठोपाठ नवी मुंबई 9, कल्याण 6, डोंबिवली 2, भिवंडी 7, मिरा भाईंदर 4 तर अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड आणि वाशिंद येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.
कल्याण डोंबिवलीतील 8 विद्यार्थी उझरोव्ह, भुको विनियन युनिव्हर्सिटी, खारकिव्ह, लविव्ह आणि क्रोप्रिव्हिन्स्कीमध्ये अडकून पडल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. इतकंच नाही तर युद्ध सुरू झाल्यापासून या सर्व विद्यार्थ्यांना त्या त्या विद्यापीठाच्या बंकरमध्ये ठेवण्यात आलं आहे, असं मुलांच्या पालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं आहे. अनेकदा खाण्याअभावी या मुलांचे हालदेखील होतं असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, युद्ध आणखी चिघळण्याच्या आत आमच्या मुलांना भारतात परत आणावं अशी आर्त विनवणी पालक करत आहेत.