डोंबिवली : निलम भारमल या शिक्षिकेने ३५ ते ४० विदयार्थ्यांना लाकडी पट्टी, स्टीलच्या रॉडने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार येथील पश्चिमेकडील स.है.जोंधळे विदयालय (इंग्रजी माध्यम) या शाळेत घडला. काल मारहाणीचा प्रकार घडला होता. संतप्त पालकांनी आज दुपारी विदयालयावर धडक देत शाळा प्रशासनाला जाब विचारला. पालकांनी विष्णुनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संबंधित शिक्षिकेविरोधात मारहाणीचा गुन्हा नोंद झाला आहे. शाळा प्रशासनानेही शिक्षिकेच्या कृत्याबाबत पालकांची माफी मागत तीचे निलंबन केले आहे.
या मारहाणीत काही मुले जखमी झाली असून त्यांच्या अंगावर मारहाणीचे वळ उठले आहेत. विशेष म्हणजे शिक्षिका भारमल या काही दिवसांपूर्वीच या विदयालयात रूजू झाल्या होत्या. त्या पाचवीच्या विदयार्थ्यांना गणित विषय शिकवायच्या. दरम्यान संबंधित शिक्षिका या नीट शिकवत नसल्याची तसेच विदयार्थ्यांना आरडाओरड आणि मारहाण करीत असल्याची तक्रार पालकांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार मुख्याध्यापकांनी शिक्षिका भारमल यांना समज दिली होती. मुख्याध्यापकांकडे केलेल्या तक्रारीच्या रागातून भारमल यांनी पाचवीच्या अ आणि ब इयत्तेतील विदयार्थी-विदयार्थींनीना बेदम मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
८० मुलांना मारहाण केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पालकांनी शाळेवर धडक देत शाळा प्रशासनाला जाब विचारला. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही प्रशासनाला धारेवर धरले होते. काही दिवसांपूर्वीच रूजू झालेली शिक्षिका भारमल यांच्याबाबत अधिकची माहीती प्रशासनाकडे नव्हती या बेजबाबदारपणाबाबत पालक आणि राजकीय पदाधिका-यांनी अधिकच आक्रमक भुमिका घेतली होती यात गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली पालकांची मागितली माफीदरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही पालकांची माफी मागतो, पुढे अशा घटना होणार नाहीत याची दक्षता घेऊ संबंधित शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली.