लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : साहित्य संमेलन असल्याने भव्य दिव्य स्वरूपात लक्ष्मीचे प्रदर्शन व्हावे की होऊ नये याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, साहित्य संमेलनाचे प्रदर्शन साधेपणाने झाले तरी चालेल. तिथे सरस्वतीची उपासना झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी जमलेल्या सर्व मंडळींनी साहित्यावर चर्चा करावी इतकीच अपेक्षा असल्याचे मत ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी रविवारी येथे मांडले.
सासणे व कृत्रिम बुद्धिमत्ता विशेषतज्ज्ञ कासम शेख यांचा कल्याण सार्वजनिक वाचनालयातर्फे सत्कार सोहळा आयोजिला होता. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सरचिटणीस भिकू बारस्कर, जितेंद्र भामरे यांच्यासह सार्वजनिक वाचनालयातील ग्रंथसेविका आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी सासणे बोलत होते.
समुद्र मंथनाचा दाखला देताना मंथनातून लक्ष्मी बाहेर पडल्यानंतर तिचे स्वागत तिथे आधीच उपस्थित असलेल्या सरस्वतीने केले. याचाच अर्थ सरस्वती लक्ष्मीपेक्षा श्रेष्ठ आहे. एप्रिलमध्ये होऊ घातलेले उदगीर येथील साहित्य संमेलन या आर्थिक वर्षातील दुसरे साहित्य संमेलन असल्याने त्यासाठी निधी उपलब्ध होईल का, याबाबत साशंकता आहेत.
अभिजात दर्जाचा ठरावउदगीर या ठिकाणी प्रथमच साहित्य संमेलन होत असून, या भागात पाच भाषांवर प्रभुत्व असलेले लोकांचे वास्तव्य आहे. या ठिकाणी उर्दू, आंध्र, तेलगू, हिंदी, मराठी, इंग्रजी यासारख्या संमिश्र भाषा बोलल्या जातात. ना. ग. गोरेंसारख्या थोर साहित्यिकांनी या ठिकाणी वैचारिक साहित्य चळवळ चालविलेला असा हा भूप्रदेश आहे. या संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा ठराव केला जाणार आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करणार, असेही त्यांनी सांगितले.