कल्याण : हैदराबादकडून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून सुमारे एक कोटी रुपयांची रोकड आणि नऊ लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे बुधवारी जप्त करण्यात आली. याप्रकरणी पाच संशयितांना अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे. रेल्वेमार्गाने होणारी तस्करी रोखण्यासाठी रेल्वेचे सर्व विभाग सक्रिय झाले आहेत. अशातच कोट्यवधी रुपयांच्या अवैध सामानाची वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वेच्या आरपीएफ व सीआयबी अधिकाऱ्यांना बुधवारी मिळाली होती. त्यानुसार आरपीएफ, सीआयबीच्या पथकाने सापळा रचून कल्याण रेल्वेस्थानकावर आलेल्या देवगिरी एक्स्प्रेसमधून पाच संशयित इसमांना ताब्यात घेतले.
गणेश मरिबा भगत, मयूर वालदासभाई कापडी, नंदकुमार वैध, संजय मनिककामे, चंदू माकणे ही आरोपींची नावे असून त्यांच्याकडून १ कोटी १ लाख ५५ हजार रुपयांची रोकड आणि ९ लाख १४ हजार रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी गुरुवारी दिली.दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही रक्कम, बिस्कीटे कशासाठी आणली याचा शोध घेत आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्याने दिली.