कल्याण: एकिकडे स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत कल्याण डोंबिवलीत रस्ते विकासाची कामे सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत म्हणून केडीएमसीकडून ७५ वाहतूक स्वयंसेवक (ट्रॅफिक वॉर्डन) ची नियुक्ती करण्यात आली आहे. महिना पाच हजार इतक्या तुटपुंज्या मानधनावर अहोरात्र काम करणा-या या ट्रॅफिक वॉर्डनला वेळेवर मानधन मिळत नाही.
गेले तीन महिन्यांपासून ते मानधनापासून वंचित आहेत. मार्चचे मानधन मिळणे अपेक्षित असताना जानेवारी, फेब्रुवारीचे मानधन एप्रिल महिना उजाडला तरी मिळालेले नाही. सध्याच्या काळ हा सणासुदीचा आहे. आधीच तुटपुंजे मानधन, ते ही वेळेवर मिळत नसल्याने कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा तरी कसा? असा सवाल संबंधितांकडून केला जात आहे.
अरूंद रस्ते आणि दिवसागणिक वाढती वाहने यात वाहतूक कोंडीचे चित्र शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये वेळोवेळी दिसून येते. वाहतूकीचे नियमन वाहतूक पोलिसांकडून होते परंतू त्यांची संख्या अपुरी असल्याने उदभवणारी वाहतूककोंडी सोडविताना त्यांच्या अक्षरश: नाकीनऊ येतात. दरम्यान शहरात सुरू असलेली रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे आणि त्यामुळे होत असलेला वाहतूकीचा खोळंबा पाहता २०१० ला वाहतूक पोलिसांच्या मदतीला केडीएमसीकडून ट्रॅफिक वॉर्डन देण्यात आले. हे वॉर्डन वाहतूक विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेतरी त्यांना मानधन हे मनपाकडून दिले जाते.
सुरूवातील वॉर्डनची संख्या ही आठ ते दहा होती. पुढे ही संख्या गरजेनुसार वाढत गेली. सद्यस्थितीला ही संख्या ७५ आहे. तब्बल १२ तास डयुटी करणा-या या ट्रॅफिक वॉर्डनला सुरूवातीच्या काळात २ हजार रूपये इतके तुटपुंजे मानधन दिले जात होते. २०१६ मध्ये मानधन वाढवून ते ५ हजार रूपये इतके करण्यात आले. दरम्यान तुटपुंजे ५ हजार रुपयांचे मानधन ही वेळेवर मिळत नसल्याचे वास्तव पहायला मिळत आहे.
मानधनात १ हजार रुपयांची वाढ५ हजार रूपये मानधनात वाढ होऊन ते ८ हजार रूपये मिळावे असा प्रस्ताव पोलीस उपायुक्त वाहतूक ठाणे शहर विभागाकडून जानेवारी २०२२ आणि नंतर सप्टेंबर २०२२ मध्ये मनपाकडे पाठविण्यात आला होता. दरम्यान आधीच्या मानधनात १ हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती मनपा च्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांच्या वतीने देण्यात आली. मानधनाला विलंब झाल्याबाबत माहिती नाही चौकशी करावी लागेल असे त्यांच्यावतीने सांगण्यात आले.