कल्याण : एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारागृहात बंद असलेल्या सलमान अस्लम खानविरोधात कोणतेही पुरावे न सापडल्याने कल्याण जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. एस. एस. गोरवाडे यांनी त्याची मंगळवारी निर्दोष मुक्तता केली.
२०१७ च्या डिसेंबर महिन्यात एका रात्री ठाणे रेल्वे स्टेशन मास्तर कार्यालयाजवळ ४० वर्षीय अनोळखी व्यक्ती जखमी अवस्थेत लोहमार्ग पोलिसांना आढळून आली होती. त्याच्या डोक्याला आणि हातापायास मार लागून त्यातून रक्तस्त्राव होत होता. त्याला रुग्णालयात दाखल करत पोलिसांनी रक्ताच्या डागांचा मागोवा घेतला. तेव्हा, काही अंतरावर एका खडीने भरलेल्या गोणीखाली एक लोखंडी कोयता पोलिसांना आढळून आला. त्यावरून कोयत्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या निदर्शास आले होते.
याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. तपासात सलमानला अटक करण्यात आली. या खटल्यात सुनावणी होऊन साक्षीदार तपासल्यानंतर सलमानविरोधात सबळ पुरावे सापडले नाही आणि त्यामुळे न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.
आरोपीतर्फे वकील तृप्ती पाटील, विद्या रसाळ, रश्मी पेंडसे ह्यांनी काम पाहिले. त्यांना वरिष्ठ वकील आलिम शेख यांनी मार्गदर्शन केले. सलमान गरीब असल्याने हा खटला मोफत चालविणाऱ्या या वकिलांचे कौतुक केले जात आहे.