- मयुरी चव्हाण
कल्याण : शहरात पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाने गंभीर रूप धारण केले असताना दुसरीकडे मात्र रेतीमाफियांनी अचूक टायमिंग साधत कल्याण डोंबिवली शहराचे खाडी किनारे पुन्हा एकदा गिळंकृत करायला सुरवात केली आहे.
दिवा - मुंब्रा - कळवा खाडीपरीसर, डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव येथील रेतीबंदर , जुनी डोंबिवली खाडीपरीसर आदी भागात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरु आहे. रेती उपसणे, या रेतीची पध्दशीरपणे वाहतूक करणे हे सर्व प्रकार रात्रीच्या सुमारास सुरू असून सध्या " रात्रीस खेळ चाले" असे म्हणत रेतीमाफियांनी खाडी किना-यांची अक्षरशः लूट करायला सुरवात केली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव परिसरात रात्रीच्या वेळी अवैध रेतीउपसा करून त्याची वाहतूकही रातोरात केली जात आहे. विशेष म्हणजे हे ट्रक पोलिसांच्याही नजरेस पडत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मध्य रेल्वेवर ठाकुर्ली , कोपर , कल्याण, कळवा, मुंब्रा , दिवा , डोंबिवली या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेमार्ग खाडी किना-याच्या बाजूला आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी रेती उपसली जाते. त्यामुळे रेल्वे रुळानाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे संक्शन पंपाद्वारे खाडीतील रेती उपसा करण्यास कायद्याने बंदी असूनही हि बंदी झुगारून रेतीमाफिया प्रशासनाच्या नाकावर टिच्चून मध्यरात्रीच्या वेळेत आपला डाव साधून घेत आहेत.
रेतीच्या एका ब्रासची किंमत सध्या साडेसहा- सात हजार ते आठ नऊ हजार आहे. डोंबिवलीत मोठागाव आणि कोपर खाडीकिनारा येथे रात्री 30 ते 40 संक्शन पाईप लावून शेकडो ब्रास रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. जागेवरच रेती खरेदी केली तर त्याची किंमत कमी असते. मात्र, इतर ठिकाणी रेती वाहून नेल्यास त्याची किंमत वाढते.
सस्पेंस कायम रेतीमाफियांवर कारवाई करताना रेतीची वाहतूक करणारे ट्रक ,संक्शन पंप व इतर यंत्रसामुग्री जप्त केली जाते. रेती उपसा करणा-यांवर बहुतांश वेळेला फक्त अज्ञात व्यक्ती म्हणून गुन्हे दाखल केले जात असल्याने खरे रेतीमाफिया कधीच समोर येत नाही. त्यामुळे ते मोकाट सुटतात.