डोंबिवली: एकीकडे सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत असताना दुसरीकडे या गुन्हयातील दोन सराईत चोरटयांना मोठया शिताफीने मानपाडा पोलिसांनी पाठलाग करून पकडले. वारीस मिराज खान (वय २४) रा. आंबिवली आणि मोहम्मद जाफर कुरेशी ( वय ३०) रा. शहाड अशी दोघा आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून चोरीचे दागिने आणि गुन्हयात वापरलेेली दुचाकी असा ८ लाख ६८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांच्या चौकशीत दोघांकडून कल्याण डोंबिवली शहरातील नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
एका प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले रवि गवळी हे २० ऑक्टोबरला सकाळी सात वाजता मानपाडा रोडवरील डी मार्ट समोर मॉर्निंग वॉक करीत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरटयांनी गवळी यांच्या गळयातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन खेचून त्यांना धक्का देत तेथून पळून गेले. या घटनेत गवळी खाली पडल्याने जखमी झाले होते. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाच्या तपासकामी कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे, वरीष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सुरेश मदने, राम चोपडे, दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे, सुनिल तारमळे, भानुदास काटकर यांचे पथक नेमले गेले होते. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार तसेच तांत्रिक तपासाद्वारे दोघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पथकांना यश आले.
साध्या वेशात लावला सापळा, पाठलाग करून पकडले
सोनसाखळी चोरीच्या गुन्हयातील दोघे आरोपी दुचाकीने नवी मुंबई तळोजा मार्गे डोंबिवलीकडे येत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत शोध पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मानपाडा, निसर्ग हॉटेल समोरील परिसरात साध्या वेशात तीन ठिकाणी सापळा लावला. तळोजा रोडकडून आरोपींची दुचाकी हॉटेल जवळ येताच पोलिसांनी त्यांना जाळयात अडकून ठेवण्यासाठी रस्त्यावरून जाणा-या अवजड वाहनांचा मार्ग रोखून धरला. आरोपींना संशय आल्याने त्यांनी दुचाकी रस्त्यावर सोडून देत पळुन जाण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आणि पाठलाग करून दोघांना पकडले.
इराणींची दुसरी फळी?
दोघेही आरोपी आंबिवली वसाहतीमधील इराणी आहेत. सोनसाखळी गुन्हयातील इराणी वसाहतीमधीलब-याच जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली गेली आहे. दरम्यान दोघा आरोपींची धरपकड पाहता ही इराणी वसाहतीमधील चोरटयांची दुसरी फळी निर्माण झाली आहे अशी चर्चा आहे.