कल्याण- कोरोनच्या दुसऱ्या लाटेनंतर बंद असलेली नाट्यगृहे खुली करण्यात आली आहे. आज डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याने या प्रयोगाला नाट्य रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. डोंबिवली, कल्याण, मुंबई, ठाणे, बदलापूर आणि अंबरनाथ परिसरातून नाट्य रसिक प्रयोग पाहण्यासाठी आले होते. यावेळी ज्येष्ठ नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी सांगितले की, यापूढे आत्ता कोरोनाची नव्हे तर नाट्य प्रेमींच्या टाळ्यांची लाट येऊ दे असे गाऱ्हाणे होय महाराजाच्या शैलीत मांडले.
चाडे चार वाजता आज हा प्रयोग होता. या प्रयोगाच्या पूर्वीच नाट्य गृहांबाहेर नाट्य रसिकांनी रांगा लावल्या होत्या. त्या आधी नाट्य अभिनेोते दामले यांच्या उपस्थितीत नटरंग देवतेचे विधीवत पूजन करण्यात आले. या प्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, सचिव संजय जाधव, ज्येष्ठ नाटककार डॉ. आनंद म्हसवेकर आणि नाट्यगृहाचे व्यवस्थापक दत्तात्रय लधवा आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी नाट्य अभिनेते दामले यांनी सांगितले की, नाट्यक्षेत्राला पूर्वी प्रमाणो उभे करायचे असल्यास राज्य सरकारने विविध सोयी सुविधा वाढवून दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर २०२२ पर्यंत नाट्यगृहांच्या भाड्यात सूट द्यावी. कोरोना काळात नाट्यक्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्याविषयी बोलण्यात काही अर्थ नाही. नाट्यकर्मीनी सरकारकडे आर्थिक मदतीची कधीच मागणी केली नाही. त्याऐवजी सरकारने टप्प्या टप्प्याने सोयी सुविधा वाढवून द्याव्यात. सरकारने सोयी सुविधा वाढवून दिल्यास डिसेंबर २०२३ र्पयत नाट्यक्षेत्र पुन्हा पूर्वी जसे होते. तसेच उभे राहू शकते असा विश्वास दामले यांनी यावेळी व्यक्त केला. नाट्यक्षेत्र बंद असल्याने अनेक नवनवीन नाट्य कलाकार, दिग्दर्शक, लेखक हे सध्या मोठय़ा प्रमाणात विविध टीव्ही वाहिन्यावरील मालिकांकडे वळले असल्याची चिंता दामले यांनी यावेळी व्यक्त केली. नाट्यक्षेत्राला एका मोठया संक्रमणाच्या काळातून जावे लागत आहे. याकडेली दामले यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.