डोंबिवली: महापालिकेच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे व्यवस्थापक दत्तात्रय लधवा हे भ्रष्टाचारी असून त्यांच्याविरोधात असंख्य तक्रारी आल्या असून त्यांची तातडीने बदली करावी अशी मागणी करणारे पत्र भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक, माजी महापौर राहुल दामले यांनी सोमवारी आयुक्त भाऊसाहेब} दांगडे यांच्याकडे केली. दामले म्हणाले की, लधवा यांच्याबद्दल खूप तक्रारी त्यांच्याकडे आल्या आहेत, त्याचा फटका अनेक सामाजिक संस्था, कलाकार आदींना बसला आहे, त्यांच्या अरेरावीमुळे लोक त्रस्त असून त्या ठिकाणची वास्तू ही उपयुक्त असून तुलनेने चांगली असल्याने कोणीही उघडपणे बोलायला तयार नाहीत.
दामले यांनाही त्यांच्या भ्रष्टाचाराचा अनुभव आला असून त्यांनी त्या विरोधात आवाज उठवला आहे.ते म्हणाले की ज्या नागरिकांना, संस्थेला असे अनुभव आले आहेत त्यांनी त्यांना संपर्क करावा, ते कोणाचेही नाव कळू देणार नाहीत, त्यामुळे कोणीही दडपण ठेऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे. अनेक तरखांची डमी बुकिंग करून ठेवणे, नंतर पैसे घेऊन तारीख देणे. साऊंड, लाईट अन्य व्यवस्था स्वतःच्या माध्यमातून करायला लावणे, इतर गोष्टीची अवास्तव बिले लावून नंतर अर्थपूर्ण व्यवहार करणे, अगदी रांगोळी काढणाऱ्या कलाकाराकडून देखील अपेक्षा करणे असेही आरोप दामले यांनी पत्राद्वारे केले आहेत. महानगरपालिकेत महासभा होत नसल्याने महापालिका अधिकाऱ्यांची अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराची कुरणे झाली आहेत अशी टीका त्यांनी केली. त्यानुसार त्या ठिकाणी योग्य कार्यवाही करून चांगली व्यक्ती व्यवस्थापक म्हणून नेमावी अन्यथा आंदोलन करावे लागेल असेही दामले यांनी आयुक्त दांगडे यांना स्पष्ट केले. यासंदर्भात लधवा यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता दामले आणि त्यांचे सेहपूर्ण संबंध आहेत असे ते म्हणाले. त्यांना नेमका काय अनुभव आला हे त्यांनी मला सांगायला हवे होते, वरिष्ठांना पत्र दिले आहे याबाबत माहितीही नाही, मी ती माहिती घेतो असे ते म्हणाले.