कल्याण ; कल्याण तालुक्यात पूरग्रस्तांच्या निधी वाटपात घोटाळा झाल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. या प्रकरणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कल्याण प्रांत अधिकाऱ््यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी तलाठी प्रशांत चाैगुले यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अजय डोंगरे यांनी माहिती अधिकारात माहिती विचारली होती. २०१९ साली अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत कल्याण तालुक्यातील अनेक नागरीकांच्या घरात पाणी घुसले होते. या पूरग्रस्तांचा पंचनामा करण्यात आला होता. पंचनाम्यानुसार पूरात बाधीत झालेल्यांना सरकारकडून निधी मिळावा असा प्रस्ताव कल्याण तहसीलदार कार्यालयाकडून राज्य सरकारला जिल्हाधिकाऱ््यांच्या मार्फत सादर करण्यात आला होता. २०१९ साली आलेल्या पूरग्रस्त परिस्थितीत आणि चक्रीवादळात बाधित झालेल्यांना बाधितांना तहसील कार्यालयाकडून ४२ कोटी ५३ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले होते. मात्र या अनुदान वाटपात घाेटाळा झाल्याची तक्रार डोंगरे यांनी केली होती.
त्यांच्या तक्रारीनुसार पूरात बाधित झालेल्या नागरीकांचे बनावट भाडेकरारनामे तयार करुन त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. ज्या नागरीकांच्या खात्यात पैसे जमा कररण्यात आले आहेत. अशा नागरीकांच्या बॅंका अन्य जिल्ह्यात आणि राज्यात हाेत्या. ते नागरीक मांडा टिटवाळा तलाठी यांच्या कार्यक्षेत्रात राहत असल्याचे भासवून सरकारची फसवणूक केली आहे. राज्य सरकारच्या मदत निधीचा गैरव्यवहार करुन आर्थिक घाेटाळा केल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य क्रायकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी कल्याणचे प्रांत अधिकाऱ्यांना चाैकशी करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणी प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणी चाैकशी केली जाईल. चाैकशीचा अहवाल मुख्य अधिकाऱ्यांना दिला जाणार आहे.