कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वी यासंदर्भात महापालिकेच्या समितीची आणखीन एक बैठक येत्या आठ दिवसात घेतली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त अनंत कदम यांनी दिली आहे.
महापालिका हद्दीतील शालेय शिक्षणासंदर्भात कोरोना काळात शाळा सुरु करण्यासंदर्भात एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी जे. जे. तडवी यांच्यासह मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील या उपस्थित होत्या.
१ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचे राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले होते. हा निर्णय कालपासून अंमलात आणला जाणार होता. मात्र अचानक जगभरात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला असल्याने परिस्थिती बदलली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शाळा १५ डिसेंबरपासून सुर करण्याचा निर्णय कालच घेण्यात आला होता.
यासंदर्भात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाकरीता गठीत करण्यात आलेल्या समितीची आज बैठक पार पडली. या समितीनेही जिल्ह्याला अनुकूल असाच निर्णय घेत महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा १५ डिसेंबर्पयत सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे. कारण कल्याण डोंबिवली महापालिका ह्द्दीतील डोंबिवली शहरात साऊथ आफ्रिकेतून आलेल्या प्रवासी त्याची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. त्याचबरोबर त्याच्यासोबत दिल्ली ते मुंबई असा प्रवास करणारा अन्य एक प्रवासी आणि नायजेरीयातून प्रवास करुन डोंबिवलीत सहा प्रवासी आल्याची माहिती समोर आली आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता १ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थगित करीत येत्या १५ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढतो की नाही हे पासून येत्या आठ दिवसात समितीची पुन्हा बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतरच १५ डिसेंबरच्या तारखेवर शिक्कामोर्तब केले जाईल असे उपायुक्त कदम यांनी स्पष्ट केले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या शाळांची संख्या ४२८ आहे. या ४२८ शाळांमध्यून १ लाख ४१ हजार ९५९ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. याशिवाय इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळांची संख्या २९३ आहे. २९३ शाळांमधून ९२ हजार ९५७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
कोरोना नियमांचे पालन करुनच हे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्यापूर्वी शाळा सॅनिटाईट करुन निजर्तूकीकरण करण्याचे आदेश दिले आहे. त्या प्रमाणे शाळांनी निर्जंतुकीकरण केले आहे. एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसता येणार आहे. शाळेची कालमर्यादा मर्यादित तासांची ठेवली जाणार आहे आदी विविध नियमावली देण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांनी शाळा सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. मात्र ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या धास्तीने त्यावर पाणी फेरले आहे.