सचिन सागरे
कल्याण : जागतिक विज्ञान दिनानिमित्त मंगळवारी कल्याणमधील शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला. पश्चिमेतील शशांक बालविहार पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका चंद्रलेखा गायकवाड व वैशाली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रदर्शनात इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे आयोजन केले होते. ध्वनीचे प्रवर्तन मानवी श्वसन उच्छ्वास यांचे प्रतिकृती असणारी फुफ्फुसांचे कार्य, ज्वालामुखी यासारखे प्रयोग प्रदर्शनात मांडण्यात आले होते. तसेच, विज्ञान प्रयोगासाठी वापरण्यात येणारी उपकरणे, सुक्ष्मदर्शक यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी विविध प्रकारे मांडणी करण्यात आली होती. यासाठी प्राथमिक विभागातील निलांबरी शिंपी, मुग्धा घाटे, माध्यमिक विभागातील चारुलता कोल्हे व रंजना तिटकारे यांनी सहकार्य केले. तसेच, पूर्वेतील होली फेथ इंग्रजी शाळेमधील विद्यार्थ्यांनी सौर उर्जा व प्रकृती संरक्षण याच्यासह अन्य विषयांवर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केले. या प्रदर्शनात शाळेतील पहिली ते नववीतील सुमारे २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी तसेच पालकांनी घेतला. प्रदर्शनासाठी लागणारे मार्गदर्शन शाळेचे ट्रस्टी सुमित पालीवाल यांच्यासह मुख्याध्यापिका सुप्रिया गायकवाड, सेली बेनजामीन व जेसमीन बिरमोले व सर्व शिक्षकांनी केले होते.