कल्याण : राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार असतानाही सोमवारी पार पडलेल्या पत्रीपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले नव्हते, अशी तक्रार त्यांनी केली. शिवसेनेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला डावलण्यात आल्याने काँग्रेसने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडी करून लढवायची असल्यास या नाराजीचे पडसाद त्यावेळी उमटू शकतात, अशी दाट शक्यता आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने पत्रीपुलाचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. हा कार्यक्रम सरकारी असताना हा भेदभाव केल्याबद्दल राष्ट्रवादीने नाराजी प्रकट केली. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनाही बोलावले नव्हते. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत साधा नामोल्लेखही करण्यात आला नव्हता. काँग्रेसचे पोटे यांनी यासंदर्भात एक पत्र काढले. त्यात त्यांनी शिवसेनेला महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विसर पडला आहे. कल्याणमध्ये संजय दत्त हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनाही बोलावले नाही. भाजप नेते शिवसेनेवर नेहमी टीका करतात. त्या भाजपच्या आमदार व खासदारांना कार्यक्रमास बोलावून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा शिवसेनेकडून अपमान करण्यात आल्याचा मुद्दा पोटे यांनी उपस्थित केला.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. राज्यातील महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा सरकारमधील घटक पक्षांचा प्रयत्न आहे. मात्र पत्रीपुलाच्या सोहळ्यात शिवसेनेने मित्र पक्षांना डावलून भाजप नेत्यांना व्यासपीठावर बसवल्याने महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी आकाराला येण्यात अडथळे येऊ शकतात. या दोन्ही शहरांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत असल्याने शिवसेनेने त्यांना गृहीत धरल्याचे बोलले जात आहे.
पत्रीपुलाच्या कार्यक्रमात भाजप खासदार कपिल पाटील यांनी पत्रीपुलाचे काम पूर्णत्वास आले असले तरी भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याची तक्रार केली. त्याचबरोबर ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम ठाणे ते भिवंडी दरम्यान प्रगतीपथावर आहे. मात्र भिवंडी ते कल्याण दरम्यान मेट्रो रेल्वेच्या कामाची निविदाच निघाली नाही. हे मुद्दे पाटील यांनी उपस्थित केले.
पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी या दिरंगाईकडे लक्ष देण्याची मागणी पाटील यांनी केली. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्राचा ५० टक्के निधी मिळत असल्याने या प्रकल्पात केंद्र सरकारचे अर्थात भाजपचे योगदान असल्याचा मुद्दा पाटील यांनी उपस्थित केला. निवडणूक आल्यावर वाटप सुरू करू नका, असा टोला शिवसेनेला लगावला.
या कार्यक्रमास उपस्थित पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. यापूर्वी भाजपच्या सत्ताकाळात कल्याण-डोंबिवलीस ६ हजार ५०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीपूर्वी वचन देणारे वचन देऊन निघून गेले. त्यामुळे निवडणुकीपुरते गाजर वाटप न करता चांगली कामे करा, असा सल्ला ठाकरे यांनी भाजपला दिला. आम्ही केलेली चांगली कामे जनतेसमोर आहेत, अशा शब्दांत पाटील यांना उत्तर दिले.