पंकज पाटीललोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : कोविड काळात अंबरनाथ शहरातील असंख्य रुग्णांसाठी जीवरक्षक ठरलेले वैद्यकीय साहित्य आता भंगारात निघण्याची वेळ आली आहे. या साहित्यांना खरेदीदार मिळत नाहीत. हे वैद्यकीय साहित्य विकण्यासाठी सहा वेळा निविदा मागवल्या. मात्र, या निविदा भरणाऱ्यांनी भंगारातील वैद्यकीय साहित्यांना देतात तेवढाही दर दिलेला नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासन हतबल झाले आहे. जवळपास चार कोटी रुपयांच्या या वैद्यकीय साहित्यांसाठी कोणतीही कंपनी ५० लाख रुपये देखील मोजायला तयार नाहीत.
अंबरनाथ नगरपालिकेने कोविड काळात रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी तब्बल ६०० हून अधिक बेडचे रुग्णालय अवघ्या काही महिन्यात उभारले होते. या रुग्णालयात सर्व वैद्यकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. व्हेंटिलेटर, बायपॅक मशीनसह ऑक्सिजन निर्मिती करणारे टँक उभारण्यात आले होते. सर्व सुविधायुक्त रुग्णालय उभारण्यासाठी त्यावेळी या साहित्याची गरज होती. सर्व साहित्य पालिकेने स्वनिधीतून आणि लोकसहभागातून उभारले होते.
ऑक्सिजन टँक निकामी होण्याचा धोका गेल्या दोन वर्षांपासून व्हेंटिलेटर, बायपँक, ऑक्सिजन टँक तसेच पडून असल्याने निकामी होण्याचा धोका आहे. या साहित्यांचा योग्य वापर व्हावा यासाठी पालिका प्रशासनाने हे वैद्यकीय साहित्य विकण्यासाठी निविदा प्रक्रिया केली. या निविदा प्रक्रियेमध्ये जे दर ठेकेदारांनी भरले ते पाहता सर्व अत्याधुनिक यंत्रे अक्षरश: भंगाराच्या दरात विकण्याची वेळ पालिकेवर आली. चांगला दर मिळावा यासाठी सलग सहा वेळा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. शेवटच्या निविदा प्रक्रियेत जे दर आले त्या दराबाबत देखील पालिका प्रशासन समाधानी नाही.
वाटाघाटीला सुरुवातवैद्यकीय साहित्यांसाठी काढलेल्या निविदेतील दर पाहिले असता नगरपालिकेला ५० लाख रुपये मिळणे देखील अवघड झाले आहे. अशा परिस्थितीमुळे आता नगरपालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराबरोबर वाटाघाटी करून या वैद्यकीय यंत्रांना चांगला दर मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केल्या आहेत.