अनिकेत घमंडी, डोंबिवली: सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक आयामातून काम भारत विकास परिषद या देशव्यापी संस्थेच्या डोंबिवली शाखेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भारत को जानो प्रश्न मंजुषा, राष्ट्रीय समुहगान स्पर्धा, गुरुवंदन, छात्र अभिनंदन या प्रामुख्याने तीन उपक्रमातून शाळांच्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ करून दिले जाते. त्या उद्देशाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद शाळेच्या विष्णूनगर शाखेने प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक दत्तनगर, तृतीय क्रमांक अरुणोदय शाखेने पटकावला. तर बॉल्सम इंटरनॅशनल शाळेने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले, त्या शाळांना पुढील स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार आहे.
मंगळवारी ही स्पर्धा संपन्न झाली होती, त्याचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. शहरातील १५ शाळांमधून १३९ विद्यार्थ्यांनी हिंदी, संस्कृत गाणी सादर करून राष्ट्रीय एकात्मता जपली. स्पर्धेत सहभागासाठी संस्थेने बहुतांश शाळांशी संपर्क केला होता. श्री गणेश मंदिरातील वक्रतुंड सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शेकडो विद्यार्थ्यांसह पालकांचा असलेला सहभाग उत्साह वाढविणारा ठरल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा ऍड. वृन्दा कुलकर्णी यांनी दिली. प्रत्येक शाळांतील स्पर्धक गटाने भाविप प्रकाशित चेतना के स्वर ह्या पुस्तिकेतील हिंदी व संस्कृत अशी दोन्ही गाणे म्हणणे बंधनकारक होते.
सर्वच शाळांनी उत्तम सादरीकरण केले. धरती की शान, क्रांती की मशाल से, कोटी कोटी कंठोने गाया, भारत वंदे मातरम्, अनेकता मे एकता, जननी जन्म भूमी इत्यादी हिंदी तर संस्कृत मध्ये ..अमृतस्य पुत्रा वयम् , मनसा सततम् स्मरणीयम्, भारतम् वंदे इत्यादी गाणी सादर झाली. ह्या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून गायिका अबोली ठोसर, अनुराधा केळकर आणि संगीत संयोजक आशुतोष वाघमारे आदींनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डोंबिवलीकर गायनाचार्य पं. महेश कुलकर्णी आणि समुहगान स्पर्धा उपक्रमाचे प्रांत संयोजक धीरज सोनार ह्यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रवीण दुधे आणि दिपाली काळे ह्यांनी केले. कार्यक्रमाला प्रांतपालक शरद माडीवाले, उपाध्यक्ष विनोद करंदीकर, डोंबिवली शाखेचे संस्थापक अध्यक्ष माधव जोशी, संस्थापक सदस्य जयंत कुलकर्णी ,शाखेचे सर्व पदाधिकारी व काही सदस्य उपस्थित होते.