डोंबिवली - ठाकुर्ली परिसरातील कचोरे खाडीत दोन लहान मुले सोमवारी दुपारी बेवारस अवस्थेत आढळली होती. त्यांची आई त्यांना तेथे सोडून गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे, परंतु या घटनेला २४ तास उलटूनही तिचा शोध लागलेला नाही. दरम्यान, त्यांच्या वडिलांचा शोध घेण्यात विष्णूनगर पोलिसांना यश आले आहे. सुब्रत दुर्याेधन साहू (वय ४५) असे त्याचे नाव असून, रत्नमाला उर्फ प्रिया असे मुलांच्या बेपत्ता झालेल्या आईचे नाव आहे. तिचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी सांगितले.साहू कुटुंब ठाकुर्लीतील ९० फुटी रोड परिसरात वास्तव्याला आहे. लॉकडाऊन कालावधीत सुब्रत यांची नोकरी गेली, तर रत्नमाला हिचा ब्युटी पार्लरचा व्यवसायही चालत नव्हता. त्यामुळे दोघेही तणावात होते. या तणावातून रत्नमालाने आत्महत्या केली का, अशी शंका उपस्थित केली जात आहे, परंतु खाडीकिनारी तिचा शोध अद्याप सुरूच आहे. खाडीकिनारी तिची चप्पल आणि मोबाइल आढळला आहे, पण ती सापडलेली नाही. त्यामुळे आत्महत्येबाबत आताच ठोस सांगता येणार नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे यांचे म्हणणे आहे.सध्या सुब्रत दूधविक्रीचा व्यवसाय करत आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटे तो दुधाच्या पिशव्या पोहोचविण्यासाठी कल्याणला गेला होता. तेथून दुपारी तो आला, तेव्हा घराला कुलूप होते. रत्नमाला मैत्रिणीकडे गेली असावी, असा अंदाज त्याने मांडला, परंतु संध्याकाळचे दूध पोहोचवून परतला असता, घराला कुलूप होते. त्याने तिचा शोध घेतला, परंतु ती सापडली नाही. पोलीस तिच्या मोबाइलवरून संपर्क साधत होते. अखेर पोलीस ठाण्याचा नंबर पाहून सुब्रतने त्यावर संपर्क साधून पोलीस ठाणे गाठल्याचे साबळे यांनी सांगितले.मुले सध्या संस्थेच्या ताब्यातसुब्रत सापडला आला असला, तरी त्याचीच ती मुले आहेत का? याबाबत ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. स्नेहांश (वय १८ महिने) आणि आयांश (वय तीन महिने) ही दोन्ही मुले सध्या ‘जननी आशीष’ या संस्थेकडे सांभाळ करण्यासाठी देण्यात आलेली आहेत. सुब्रतची ओळख पटविल्यावर त्याच्या ताब्यात त्यांना दिले जाईल, असेही साबळे म्हणाले.
‘त्या’ तान्हुल्यांच्या वडिलांचा लागला शोध, आई बेपत्ताच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2020 1:36 AM