लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस शासनाकडून उपलब्ध न झाल्याने ठराविक दिवसांनी लस घेण्याची डोंबिवलीतील नागरिकांची डेडलाईन चुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन ही लस २ मार्चपासून देण्यास सुरुवात झाली होती. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोविशिल्ड लस ही सहा ते आठ आठवडे (४२ ते ५६ दिवस) आणि कोवॅक्सिन लस चार ते सहा आठवड्यांत (२८ ते ४८ दिवस) घेणे जरुरी आहे. काही दिवसांपासून डोंबिवली एमआयडीसीतील सर्वच खासगी रुग्णालयांत कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस उपलब्ध नसल्याने नागरिक माघारी परतत आहेत. कोव्हॅक्सिन लस उपलब्ध आहे, पण ज्यांनी पहिला डोस घेतला असेल त्यांनाच तो देण्यात येत आहे.आणखी काही दिवस कोविशिल्ड लस मिळाली नाही तर मुदतीत लस घेण्याची वेळ निघून जाईल. लसींचा पुरवठा तातडीने करण्याची आवश्यकता आहे. त्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय झाल्याने गर्दी वाढणार आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्या वरिष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे केडीएमसीने तातडीने कोविशिल्ड लसींचा पुरवठा करावा, अशी मागणी मिलापनगरचे रहिवासी राजू नलावडे यांनी केली आहे.
कोविशिल्ड लस संपल्याने दुसरा डोस थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:44 AM