डोंबिवली: वृद्धाश्रमांतील ज्येष्ठ नागरिकांना प्रेम आपुलकी आणि आस्था पूर्वक संवादाची जास्त गरज आहे. त्यानुसार रोटरी द्वारे कार्यक्रम आखण्याची आवश्यकता असल्याचे सूचक मत रोटरी ३१४२ चे प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी त्यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांच्या रोटरी सर्विस वीकअंतर्गत ,ज्येष्ठ महोत्सवाचे आयोजन रोटरी भवन, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व येथे करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचे उद्घाटन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शेकडोंच्या संख्येने उपस्थित वरिष्ठ नागरिकांशी त्यानी संवाद साधला. वरिष्ठ नागरिकांत कॉम्प्युटर आणि सायबर सजगते साठी ऍड. शिरीष देशपांडे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, सायबर वॉरियर यांच्या सहकाऱ्याने मोलाचे मार्गदर्शन दृकश्राव्य माध्यमातून केले. पोलिसांनी नागरिकांना कसे सजग राहिल पाहिजे? हे सांगितले. तसेच सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना, प्रलोभनांना बळी पडू नका, असे आवाहन केले.
नागरिकांसाठीच्या विविध पोलीस सेवांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. एसीपी कुराडे यांनी या सायबर गुन्ह्यांमागील मानसिकतेवर प्रकाश टाकला. पोलीस व नागरिकांमध्ये सुसंवाद हवा. त्यासाठी केवळ आर्थिक नव्हे तर वरिष्ठांचा अन्य प्रश्नासाठी सुद्धा पोलिसांची मदत घेऊ शकतात असे प्रतिपादन त्यांनी केले. यानंतर वरिष्ठ नागरिकांनी गीत गायनाचा कार्यक्रम सादर केला आणि रोटरीतर्फे वरिष्ठ नागरिक क्लब अध्यक्षांचे सत्कार झाले क्लबचे अध्यक्ष रघुनाथ लोटे यांनी प्रास्ताविक केले, सल्लागार आणि पूर्वाध्यक्ष रो.राधिका गुप्ते यांनी ज्येष्ठ महोत्सवाचे उद्दिष्ट आणि आयोजन याबद्दल माहिती दिली.
रोटरी सर्विस वीक चे डिस्ट्रिक्ट अव्हेनु चे रो. डॉ.सर्जेराव सावंत,रो. दयाराम गगरे,सीनियर सिटीजन अवेन्यू चे रो. दिलीप गुप्ते व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. विनायक आगटे यांनी केले. डोंबिवलीतील वरिष्ठ नागरिक समन्वयन समितीचे अध्यक्ष सुरेश पालकर यांच्या १७ वरिष्ठ नागरिक क्लबमधून जवळजवळ २०० वरिष्ठ नागरिक त्या उपक्रमात सहभागी झाले होते. पोलिसांकडून असे कार्यक्रम वारंवार व्हावेत अशी इच्छा अनेक वरिष्ठ नागरिकांनी व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.