डोंबिवली: माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कल्याण ग्रामीण भागातील ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश गोविंद म्हात्रे यांची शिंदे सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष संघटनेच्या विरोधात काम करीत असल्याने म्हात्रेंवर कारवाई करण्यात आली आहे. शिंदे सेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी याबाबत पत्रक जाहीर केले आहे.
शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर म्हात्रे यांनी उध्दव सेनेत राहणे पसंत केले होते. परंतू नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत म्हात्रे यांनी शिंदे सेनेला साथ दिली होती. दरम्यान कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेकडून राजेश मोरे हे उमेदवार असताना म्हात्रे हे पक्ष संघटने विरोधात काम करत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे गेल्या होत्या. त्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार म्हात्रे यांची पक्ष संघटनेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हाप्रमुख लांडगे म्हणाले. म्हात्रे हे उध्दव सेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांच्या प्रचाराचे काम करत आहेत याकडेही लांडगे यांनी लक्ष वेधले.जे बोललो ते थेट, लपवलं काही नाही -राजेश मोरे हे स्थानिक नाहीत. ते डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव ठाकुर्लीत राहतात. ते ज्या भागाचे नगरसेवक आहेत त्यातील अर्धा भागच कल्याण ग्रामीण मतदारसंघात येतो. मागील २०१९ च्या निवडणुकीतही स्थानिक उमेदवार दिला गेला नव्हता. यंदाही तीच पुनरावृत्ती घडली. बाहेरील उमेदवार आमच्यावर का लादता असा प्रश्न स्थानिक शिवसैनिक करत आहेत. त्यामुळे सुभाष भोईरांचे काम करू असे मी थेट जिल्हाप्रमुख लांडगे यांच्याशी बोललो होतो, काही लपवल नाही. त्यात मी शिंदे सेनेचा सदस्य अथवा पदाधिकारीही नाही त्यामुळे माझी हकालपट्टी करण्याचा लांडगे यांना अधिकार नाही - प्रकाश म्हात्रे, ज्येष्ठ शिवसैनिक कल्याण ग्रामीण