कल्याण : कठोर प्रशिक्षण आणि योग्य तयारीनंतर एवरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वीरीत्या पोहोचणारी सेक्रेड हार्ट स्कूल शहरातील पहिली शाळा ठरली आहे. जगातील सर्वात तरुण एव्हरेस्ट गिर्यारोहक पूर्णा व गिर्यारोहक राकेश यांच्या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थ्यांसह शिक्षिका अबर्णा व सजिठा एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचले. आणि त्यांच्या एवरेस्ट मोहिमेची सांगता केली.
सेक्रेड हार्ट स्कूलमधील क्रिश पेसवानी, आदिल पिल्लई, शिवराज गोरड, साजिरी गवळी, मिताशी कुकरेजा, आदिती पुनेजा आणि संजना पानसरे या १६ ते १७ वयोगटातील सात विद्यार्थ्यांची २० स्पर्धकांच्या गटातून निवडक करण्यात आली. २० एप्रिल ते ६ मे या कालावधीत कल्याण ते मुंबई विमानतळ, नंतर विमानाने काठमांडू, त्यानंतर लुक्लाच्या उड्डाणासाठी रामेचाप विमानतळापर्यंतचा प्रवास केला. लुक्ला येथून ११ दिवस चाललेल्या या ट्रेकिंग मोहिमेचा समारोप सातव्या दिवशी एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या विस्मयकारक दृश्याने पूर्ण झाला. या ठिकाणच्या वातावरणाने विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक भारावून गेले होते.
ट्रेक आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासात प्रतिकूल हवामानामुळे अनपेक्षित आव्हानांना या सर्वांना सामोरे जावे लागले. तीन दिवस लुकला येथे अडकलेल्या या गटाला अखेर सुरक्षिततेसाठी हेलिकॉप्टरद्वारे काठमांडूला हलविण्यात आले. अनेक अडचणी असूनही एव्हरेस्ट बेस कॅम्पवरील उल्लेखनीय साहसाचे अविस्मरणीय अनुभव आणि चिरंतन आठवणी घेऊन विद्यार्थी परतले.
दक्षिण बेस कॅम्प नेपाळमध्ये ५,३६४ मीटर (१७,५९८ फूट) उंचीवर आहे. हे माउंट एव्हरेस्टवरील एक प्राथमिक शिबिर स्थळ आहे जे गिर्यारोहक त्यांच्या चढाई आणि उतरण्याच्या वेळी वापरतात. या मोहिमेसाठी विद्यार्थी पाठवणारी सेक्रेड हार्ट ही पहिली शाळा आहे. या मोहिमेसाठी अनुभवी गिर्यारोहकांचे मार्गदर्शन आणि शाळेचा पाठींबा मिळाला. त्यामुळे या तरुण साहसी विद्यार्थ्यांनी आव्हानात्मक ट्रेकमध्ये लवचिकता आणि टीमवर्कचे प्रदर्शन करत एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचण्याची मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्याचे शिक्षिका अबर्णा यांनी सांगितले.