सचिन सागरेलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : सेंच्युरी रेयॉन कंपनीत साडेतीन वर्षांपूर्वी वडिलांच्या जागी कामाला लागलेल्या शैलेश यादव (२५, रा. म्हारळ) याला कंपनीने सहा महिन्यांपूर्वीच सेवेत कायम केले होते. नोकरीत कायम झाल्याने शैलेश आनंदित होता. भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत होता. मात्र, काळाने त्याच्यावर झडप घालून यादव कुटुंबाचा आनंद हिरावून घेतला.
कंपनीतील सीएस-दोन विभागात हेल्पर म्हणून काम करत असलेला शैलेश शनिवारी सकाळी कंपनीत पोहोचला तेव्हा हा आपला नोकरीतील अखेरचा दिवस असल्याची कल्पनाही त्या बिचाऱ्याला आली नसेल. टँकरची तपासणी करत असतानाच अचानक स्फोट झाला आणि या स्फोटात शैलेश यादव आणि राजेश श्रीवास्तव या दोघांचा मृत्यू झाला.
शैलेश हे आपला भाऊ ब्रिजेश यांच्यासोबत म्हारळ येथे रहात होता.. पत्नी, तीन वर्षांचा मुलगा, एक वर्षांची मुलगी हे आझमगड येथील मूळ गावी राहायला आहेत, तर त्यांचा एक भाऊ भिवंडीत राहायला आहे. शैलेशचा भाऊ ब्रिजेशला या घटनेमुळे प्रचंड धक्का बसला आहे. शैलेशची पत्नी व लहान मुलगा, मुलीला ही घटना कशी सांगायची याची चिंत आहे.
नातेवाइकांची रुग्णालयात धावया घटनेनंतर बेपत्ता असलेले अनंता वासिंद येथील भातसई येथे पत्नी, तीन मुली आणि एका मुलासोबत राहत असल्याची माहिती त्यांचे भाऊ बाळकृष्ण यांनी दिली. कंपनीत झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, अनंता यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
रहिवासी भयभीतशहाड येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीत झालेल्या या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, कल्याण पश्चिमेकडील गौरी पाडा, आंबिवली आणि शहाड गावठाण परिसरात घरांना हादरे बसल्याचे रहिवाशांनी सांगितले.
प्रवासी घाबरलेत टिटवाळा लोकलने प्रवासी मुंबईच्या दिशेने जात होते. लोकल ११:१४ च्या सुमारास आंबिवली रेल्वे स्थानकात थांबली असताना एक मोठा आवाज ऐकू आल्याने धक्का बसला.