कल्याण: रेल्वेच्या जागेतील झोपडीधारकांना सात दिवसात घरे खाली करण्याच्या नोटीसा रेल्वेने बजावल्याने हवालदिल झालेल्या कल्याणच्या झोपडीधारकांची आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली. यावेळी "मर जायेंगे, जान देंगे, लेकीन घर नही देंगे. झोपडीधारकांच्या पाठीशी मी आहे. या लढ्याचे नेतृत्व मीच करणार आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, 'मी येऊन गेल्यावर आता बाकी नेते इथे येतील', असा खोचक टोला त्यांनी लगावला.
"निवडणूका आल्या आहेत. सगळेच लोक तुमच्याकडे हात जोडायला येतील. आधी अनेक वेळा घरं वाचवली तरी मतं मागितली नाही. आताही घरं वाचवेन पण मतं मागायला येणार नाही," असं म्हणत आव्हाडांनी भाजपला टोला लगावला. आनंदवाडी येथील सरस्वती शाळेसमोर झोपडीधारक मोठया संख्येने जमले होते. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी हजर होते.
"हा केवळ कल्याणच्या झोपडीधारकांचा प्रश्न नाही. कळवा, मुंब्रा, कल्याण अन्य ठिकाणासह पाच लाख झोपडीधारकांचा प्रश्न आहे. पाच लाख झोपडीधारक एकाच वेळी रस्त्यावर उतरतील. तसं व्हायला नको असेल तर केंद्र आणि राज्य सरकारला ही समस्या सोडवावी लागेल. जेव्हा पोटावर आणि छातीवर येतं, तेव्हा गरीब माणूस ते सहन करु शकत नाही. नोटिसा पाठवणारी रेल्वे इतक्या वर्षे झोपली होती का?" असा सवाल मंत्री आव्हाड यांनी प्रशासनाला केला.
"रेल्वे रोको आंदोलन त्यांनी काही वर्षापूर्वी केले होते. तेव्हा मध्य रेल्वेसह देशभरात जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. ती वेळ पुन्हा रेल्वेला आणायची आहे का? राज्य सरकारचा एसआरएचा कायदा जसाच्या तसा उचलून या जमिनीवर टाका. २०११ पर्यंतच्या सगळया झोपड्या संरक्षित आहेत. सरकारची भूमिका लोकाभिमुख असली पाहिजे. लोकविरोधी भूमिका घेऊन चालणार नाही. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनाही लक्ष घालावे लागेल", असेही आव्हाड यांनी नमूद केले.