कल्याण : कल्याणमधील ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव शिवसेनेकडून साजरा केला जातो. मात्र यंदा सरकार बदलानंतर शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ठाकरे गट कायदेशीर सल्ला घेऊन न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.
किल्ले दुर्गाडीवर दुर्गाडी देवीचे मंदिर आहे. या मंदिरातील देवीचा उत्सव नवरात्रीस नऊ दिवस साजरा केला जातो. या नवरात्र उत्सवाची परवानगी जिल्हाधिकारी देतात. शिवसेनेचा कल्याण शहर प्रमुखास हा उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली जाते. त्यानुसार शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परवानगी मागितली होती.
सत्ता बदलानंतर शिंदे गटाचे कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनीही जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती. दोन्ही गटाकडून नवरात्र उत्सवाची परवानगी मागितली गेली असली तरी जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे आमदार भोईर यांना उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे. परवानगी मिळताच आमदार भोईर यांनी सांगितले की, हा गावकीचा उत्सव आहे. दुर्गाडी देवी ही आमची ग्रामदेवता आहे. जिल्हाधिका:यांनी परवानगी दिली असल्याने हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
दरम्यान, शिवसेना शहर प्रमुख बासरे यांनी सांगितले की, आम्हाला परवानगी नाकारण्यात आली आहे. ती कोणत्या कारणास्तव नाकारली आहे. जिल्हाधिकारी यांनी कोर्टाच्या भूमिकेत राहू नये. परवानगीसाठी प्रथम अर्ज कोणाचा आला याचा विचार त्यांनी करायला हवा होता. या उत्सवाला ५४ वर्षाची परंपरा आहे. तिला छेद देण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाला सत्तेच्या जोरावर दाबण्याचे काम करीत आहे. परवानगी नाकारली असल्याने कायदेशीर सल्ला घेऊन न्यायालयात दाद मागितली जाईल.