कल्याण - कल्याणमधील प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने पोलिस आणि जिल्हाधिकारी प्रशासनाकडे मागितली आहे. या पैकी कोणत्या गटाला परवानगी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यावर ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले. त्याचे पडसाद राज्यभरात विविध ठिकाणी उमटले. मात्र कल्याणधील शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने आले नव्हते.
नुकताच दहिहंडी उत्सव पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहिहंडी साजरी करण्याची परवानगी शिंदे आणि ठाकरे गटाने मागितली होती. पोलिसांनी दहिहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी शिंदे गटाला दिली. या प्रकरणी ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन दाद मागितली. न्यायालयाने ठाकरे गटाने अन्य ठिकाणी दहिहंडी साजरी करावी असे सूचित केले. ठाकरे गटाने छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चौकात दहिहंडी साजरी केली. दहिहंडी पाठोपाठ आत्ता किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा केला जातो.
या उत्सवासाठी शिंदे गटाने जय्यत तयारी सुरु केली आहे. उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल असे शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी सांगितले. मात्र दुर्गाडी किल्ल्यावर उत्सव साजरा करण्याची परवानगी ठाकरे गटाने पोलिसांकडे मागितली आहे. त्यासाठी ठाकरे गटाने जिल्हाधिकारी , पोलिस आयुक्त, उपायुक्त, प्रांत, तहसीदार, बाजारपेठ पोलिस ठाणे आदींकडे रितसर पत्रव्यवहार केला आहे. दोन्ही गटाकडून परवानगीचा अर्ज केला गेल्याने बाजारपेठ पोलिसांनी दोन्ही गटाना बोलावून त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.
ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे यांनी सांगितले की, गेल्या वर्षी दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी शिंदे गटाला देण्यात आली होती. दोन्ही गटाचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला असून त्याचा अहवाल सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. दोन्ही गटापैकी पोलिस आणि जिल्हाधिकारी प्रशासनाकडून नवरात्र उत्सवाची परवानगी कोणाला मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.