पंकज पाटील, अंबरनाथ: मध्ये डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचा दुसरा दिवस गायिका साधना सरगम आणि गायक अभिजीत भट्टाचार्य यांच्या सदाबहार गाण्यांमुळे संस्मरणीय ठरला. नव्वदीच्या दशकातील या एकापेक्षा एक सरस गाण्यांना अंबरनाथकरांनीही उत्स्फूर्त दाद दिली. साधना सरगम आणि अभिजीत भट्टाचार्य ही नव्वदीच्या दशकापासून गाजलेली गायक जोडी म्हणून ओळखली जाते.
गायिका साधना सरगम यांनी पहला नशा, हर किसी को नहीं मिलता यहा पार जिंदगी मैं, आप के आ जानेसे, जब कोई बात बिगड जाये, रंगीला रे, ढोल बजने लगा, जय हो, मिले सुरू मेरा तुम्हारा अशी त्यांची गाजलेली गाणी सादर केली. या गाण्यांना अंबरनाथकरांनी उत्स्फूर्त दाद दिली. तर त्यानंतर गायक अभिजित भट्टाचार्य यांच्या बादशाह, वादा रहा, बडी मुश्किल है, बस इतना सा ख्वाब है, तौबा तुम्हारे ये इशारे, सुनो ना सुनो ना या सदाबहार गाण्यांनी मैफिल अंबरनाथकरांणा अनुभवता आला. अभिजित भट्टाचार्य यांच्या गाण्यांनाही अंबरनाथकरांनी चांगली दाद दिली.
यानंतर गायक जय भट्टाचार्य यांनीही आपली गाणी सादर केली, या गाण्यांना तरुणाईने मोठी दाद दिली. या कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल साधना सरगम आणि अभिजित भट्टाचार्य यांनी आयोजक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि या कार्यक्रमाला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल अंबरनाथकरांचे आभार मानले. इतक्या दर्दी रसिकांसमोर येण्याची संधी आयुष्यात इतक्या उशिरा मिळाली याचे वाईट वाटते, पण आज ती संधी मिळाली, याचा आनंद असून याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विशेष आभार मानतो, असे गायक अभिजित भट्टाचार्य याप्रसंगी म्हणाले. आर्ट फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी अंबरनाथकरांनी मोठा प्रतिसाद दिला. मुख्य कार्यक्रमाचे ठिकाण तर हाऊसफुल्ल झालेच, पण बाहेरच्या परिसरातही लोक कार्यक्रम ऐकण्यासाठी उभे होते. बाहेरच्या परिसरात लावलेल्या एलईडी स्क्रिनवर अंबरनाथकरांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.