कल्याण: केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी निवडून आणण्यासाठी महाराष्ट्रातून महायुतीचे ४५ हुन अधिक उमेदवार निवडून देण्याचे सर्वांनी ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांचे काम करणार असल्याची कबुली कल्याण पूर्वेतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना दिली अशी माहिती कल्याणचे भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.
भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे सेनेचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यातील आधीपासूनच सुरू असलेला वाद गोळीबार प्रकरणानंतर अधिकच वाढला. त्यात शुक्रवारी आमदार गायकवाड यांचे समर्थक असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी एक बैठक घेऊन खासदार शिंदे यांचा प्रचार करणार नाही. कल्याण लोकसभेतून भाजपाला उमेदवारी दयावी असा ठराव करून तो भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला होता. या ठरावाचे पडसाद शिंदे सेनेतही उमटले होते. एकिकडे ठराव करून नाराजी व्यक्त केली गेली असताना दुसरीकडे मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेच राहणार असे ठामपणे सांगत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणाच केली . दरम्यान पूर्वेतील उदभवलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी रविवारी चव्हाण यांच्या निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली होती. यात चव्हाण यांनी पुर्वेतील नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढून वादावर पडदा टाकला गेल्याचा दावा केला जात आहे.
गणपत गायकवाड यांच्या भूमिकेचे समर्थनपहिले राष्ट्र, नंतर पक्ष आणि मग स्वत:चा विचार ही प्रत्येक भावना भाजप कार्यकर्त्यांची असते याला आमदार गायकवाड हे देखील अपवाद नाहीत. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे. राज्यात ४५ हून अधिक खासदार निवडुन आणायचे आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना निवडुन दयायचे आहे. या गणपत गायकवाड यांनी घेतलेल्या भुमिकेचे कार्यकर्त्यांनी समर्थन केल्याची माहिती सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.