मयुरी चव्हाण काकडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण डोंबिवली शहरातलं राजकारण राज्यामध्ये कायमच चर्चेचा विषय राहिलाय. लोकसभा निवडणुका झाल्या मात्र आता विधानसभेमध्ये राजकीय फटाके फुटणार असे चित्र दिसून येते .त्यातच कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गटातील अनेक जण इच्छुक असल्याची चर्चा आहे. यामध्ये डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जातेय. एकीकडे कल्याण ग्रामीण हा मतदारसंघ मनसेकडे आहे. मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील हे या विधानसभेचे नेतृत्व करतायेत. मनसेने लोकसभेला खासदार शिंदेंना दिलेला पाठिंबा आणि आता विधानसभेच्या निवडणुका यामध्ये कल्याण ग्रामीण बाबत नेमकं शिंदेंची शिवसेना आणि विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार ते पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
राजेश मोरे हे सुरुवातीला राष्ट्रवादी पक्षामध्ये होते. त्यानंतर ते शिवसेनेमध्ये आले. तेव्हापासून शिंदेंचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. शांत, संयमी आणि पक्ष बांधणीचे कसब असलेले मोरे यांना सभागृह नेतेपद सुद्धा देण्यात आले. त्यानंतर डोंबिवली शहर प्रमुख पदही पक्षाने त्यांना दिले. डोंबिवली शहरामध्ये राजेश मोरे यांचा चांगला जनसंपर्क आहे. कल्याण ग्रामीणचा बऱ्यापैकी भाग हा डोंबिवली शहराला लागून आहे जवळपास ३१ प्रभाग डोंबिवली मध्ये येतात आणि या ठिकाणी राजेश मोरे यांचे पारडे जड असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणं आहे.
कल्याण ग्रामीण मध्ये निवडणूक लढवण्याच्या पार्श्वभूमीवर मोरे यांनी तयारीला सुरुवात केली असून घराघरात जाऊन चाचणी केली जात आहे त्याचप्रमाणे मतांची गणित जुळवण्याचा सुद्धा कामाला सुरुवात झाली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत राजेश मोरे यांना संपर्क साधला असता आपण कल्याण ग्रामीण मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची गोष्ट त्यांनी मान्य केली मात्र भविष्यात वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितलं.
तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांचा सुद्धा नाव आघाडीवर असून भोईर यांनी सुद्धा निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी केली आहे. पण शिवसेना शिंदे गट इथून निवडणूक लढवणार का की या विधानसभेत बंडखोरी होणार ? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. राजू पाटील, सुभाष भोईर ,राजेश मोरे हे सर्व भावी उमेदवार आगरी समाजाचे असल्याने आगरी मतांचं विभाजन या ठिकाणी होणार हे मात्र नक्की पण इतर भाषिकांचा कल हा नेमका कोणत्या पक्षाला जातो की उमेदवार बघून मतदार मतदान करतात ? हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल...