सदानंद नाईक
उल्हासनगर : सिंधी बहुल उल्हासनगरात शिवसेना वाढविण्याचे काम करणारे चंद्रकांत बोडारे यांची कल्याण जिल्हाप्रमुख पदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली. कल्याण पूर्व, उल्हासनगर व अंबरनाथ मध्ये शिवसेनेला पूर्वीचे वैभव मिळवून देणार असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत बोडारे यांनी दिली.
उल्हासनगरचे दुसरे शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी शहरात पप्पु कलानी यांचा प्रभाव असतांना शिवसेना वाढविण्याचें काम बोडारे यांनी केले. तसेच सिंधी व मराठी वाद निर्माण झाल्यावर मराठी नागरिकांच्या मागे ठामपणे उभे राहिले होते. त्यांच्या शिवसेना शहरप्रमुख पदाच्या काळात महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आली. यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. तसेच ते कल्याण उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी यशस्वीपणे संभाळत होते. गोपाळ लांडगे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावर त्यांच्या जागी चंद्रकांत बोडारे यांची जिल्हाप्रमुख पदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली आहे.
शहरात बोडारे यांची राजकीय ताकद मोठी असून त्यांच्या धर्मपत्नी शीतल बोडारे, लहान भाऊ व शिवसेना नेते धनंजय बोडारे हे नगरसेवक आहेत. तसेच धनंजय बोडारे यांच्या धर्मपत्नी वसुधा बोडारे हेही नगरसेविका आहेत. त्यांचा शहर शिवसेनेत राजकीय दबदबा असून उल्हासनगरला शिवसेना फुटीची मोठी झळ बसली नाही. बहुतांश पदाधिकारी व नगरसेवक हे चंद्रकांत बोडारे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभे ठाकले आहेत. कल्याण जिल्हा परिसरात शिवसेनेला पूर्वीचे वैभव आणणारच अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.