मुरलीधर भवार,कल्याण : कल्याण पूर्वेतील वालधूनी नाल्यातील नाल्याची सफाई केलेली नाही. पावसाळा तोंडावर आला असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून नालेसफाई का केली जात नाही ? असा संतप्त सवाल शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
नालेसफाई केली नसल्याने या भागातील नागरिकांना पावसाळयात पूरसदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. नागरिकांच्या घरात पाणी घुसले त्याची जबाबदारी तुम्ही घ्याल का? असा जाब अधिकाऱ्याला विचारत त्यांना गायकवाड यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.
पावसाळा तोंडावर आला असताना ठिकठिकाणी नालेसफाई सुरु आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून नालेसफाई केली जात असल्याचा दावा केला जात आहे. नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. कल्याण पूर्वेत नालेसफाईची काय परिस्थिती आहे. हे पाहण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख गायकवाड हे महापालिका अधिकाऱ्यांसोबत वालधूनी नदी परिसरात गेले असता त्याठिकाणी नालेसफाई झाली नसल्याचे दिसून आले. ही बाब गायकवाड यांनी अधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिली.
वालधूनी परिसरात नालेसफाई न झाल्याने पूर सदृश्य स्थिती निर्माण होते. याचा फटका परिसरातील नागरिकांना बसतो. यंदा तरी नालेसफाई व्यवस्थित करा असे गायकवाड यांनी अधिकाऱ्यास सांगितले. या पाहणी दरम्यान उपस्थित असलेल्या महापालिका अधिकारी सुरेश सोळंकी फक्त इतकेच सांगितले की, या प्रकरणी अभियंत्याना सूचना दिली जाईल. नालेसफाई न करणाऱ्या कंत्राटदाराच्या विरोधात महापालिका प्रशासनाकडून ठोस करणार की नाही. नालेसफाईच्या नावावर खर्च केला जाणारा नागरिकांच्या पैशाचा असाच चुराडा केला जाणार? असा संतप्त सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.