मुरलीधर भवार, कल्याण- तुम्हाला काय ? लोक आम्हाला विचारतात. कल्याण बुडाले तर काय ? असा संतप्त सवाल शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना केला आहे. आमदार भोईर यांनी नालेसफाईची पाहणी केली. या पाहणी दरम्यान नालेसफाई झाली नसल्याने आमदारांनी संताप व्यक्त केला. पुन्हा येत्या गुरुवारी नालेसफाईच्या कामाची पाहणी करणार आहे. नालेसफाई झाली नाही तर अधिकारी आणि कंत्राटदाराची गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा आमदारांनी दिला आहे.
आमदार भोईर यांनी आज नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी शहर अभियंत्या अनिता परदेशी आणि जल मलनिस्सारण विभाागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगूळ उपस्थित होते. महापालिकेने १० प्रभाग क्षेत्रात ९५ मोठे नाले आहेत. या नाल्यांच्या सफाईकरीता महापालिकेने ३ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहे. कंत्राटदारांकडून नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी नालेसफाईच्या कामावर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. पहिल्या पावसातच नालेसफाईची पोलखोल होते.
अतिवृष्टी झाल्यावर अनेक नागरीकांच्या घरात पाणी शिरते. काही नागरीकांनी आमदारांना नालेसफाईचे फोटो पाठवून केली जात असलेली नालेसफाई ही या वर्षीची आहे का ? असा सवाल उपस्थित केला होता. ज्या ठिकाणचे नागरीकांनी फोटो पाठविले. तो नाला जरीमरी नाला आहे. त्या नाल्याची पाहणी आज आमदारांनी केली. त्याठीकाणी नालेसफाई झाली नसल्याचे दिसून येताच आमदार भोईर यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. कंत्राटदार कंंत्राट घेतो. त्याच्याकडून नालेसफाईचे काम केले जात नसल्यास त्या कंत्राटदारांची बिले काढू नका. नालेसफाईच्या कामाची पुनहा येत्या गुरुवारी पाहणी केली जाईल. नालेसफाई झाली नसल्यास कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना सोडणार नाही असा सज्जड दम दिला आहे.
या वेळी उपस्थित असलेले कार्यकारी अभियंता नवांगूळ यांनी सांगितले की, जरीमरी नाल्याची सफाई करण्याकरीता १० ते १७ मे दरम्यान नाल्यात पोकलेन उतरविले होते. सफाई प्रक्रिया सुरु आहे. आमदारांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले जाईल. ३० मे नंतर नालेसफाई न झाल्यास संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात कारवाई करणार आहे.