- मयुरी चव्हाणकल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांसोबत अनधिकृत बॅनरबाजीचा विषयही नेहमीच चर्चेत असतो. एकीकडे राजकीय पक्षांकडून पालिका प्रशासनावर चिखलफेक केली जात असताना राजकीय पक्षांकडूनही अनेकदा नियमांना तिलांजली दिली जातं असल्याचं समोर आलंय. कल्याणामध्ये पुन्हा राजकीय पक्षांनी अनधिकृत बॅनरबाजी करत पालिकेच्या 'त्या' सुचनेलाच हरताळ फासला आहे. कल्याणातील चिकणघर परिसरात एक बॅनर सध्या चर्चेचा विषय झाला आहे. विशेष बाब म्हणजे या बॅनरच्या मागे पालिकेने एक नोटीस लावली होती. या जागेवर अनधिकृत जाहिरात किंवा फलकबाजी करू नये असा आशय यावर लिहिला आहे. मात्र या नोटिसीवरच वाढदिवसाचा एक बॅनर लावण्यात आला आहे. जागरूक नागरिक भूषण पवार यांने याबाबत प्रशासनाकडे तक्रारदेखील केली आहे. दरम्यान सत्ताधारी पक्षाकडूनच अशाप्रकारे प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जातं असल्यानं आश्चर्य व्यक्त होतं आहे.केडीएमसीकडून अनधिकृत फलकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली होती. तरीही शहरात अनधिकृत बॅनरबाजी सुरू आहे. आता तर पालिकेच्या नोटिसीवरच फलक लावून खुलेआमपणे नियम धाब्यावर बसवले जातं असल्याचं दिसून येतंय.
इथे अनधिकृत जाहिराती लावू नका! पालिकेच्या फलकावरच शिवसेनेनं लावला बॅनर; नियम धाब्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 3:20 PM