कल्याण - कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यासाठी कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा करुन मंजूरी दिली आहे. याप्रकरणी मनसे आमदारांनी सोशल मिडियावर पत्र फिरविले. त्यात मानपाडा रस्त्याच्या मंजूरी पत्रावर खासदारांचे नाव खोडून स्वत:च्याच नावाचा उल्लेख असलेले पत्र फिरविले आहे. मनसे आमदाराला शिवसेना आता केवळ इशारा देत आहे. यापुढे असा प्रकार घडल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करुन कारवाई करण्याचा सज्जड दम शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दिला आहे. मनसे आमदार पाटील यांनी खासदारांनी मंजूर केलेल्या विकास कामासंदर्भात टिका करीत श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत सोशल मीडियावर खोडसाळपणा केला आहे. मनसे आमदारांच्या विरोधात डोंबिवलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी नगरसेवक म्हात्रे यांनी उपरोक्त इशारा दिला. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मोरे, युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्यासह सदानंद थरवळ, एकनाथ पाटील, प्रकाश म्हात्रे, योगेश म्हात्रे, राजेश कदम आदी उपस्थित होते. रमेश म्हात्रे यांनी सांगितले की, राजू पाटील हे जिल्हा परिषदेचे सदस्यही होते. त्यांनी त्यावेळेसही काही एक काम केले नाही. आमदार असतानादेखील त्यांनी कोणते भरीव विकास काम केले हे दाखविले पाहिजे. आता कोरोना काळ आहे सुरू आहे, म्हणून आमदार पाटील हे मतदारसंघात दिसत आहेत. अन्यथा ते दुबई परदेशातील अन्य ठिकाणी असतात, ते लोकांना भेटतात कुठे अशी खोचक टिकाही त्यांनी केली. युवा सेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, मनसे आमदारांचे नाव पाहणी आमदार ठेवले पाहिजे. ते केवळ पाहणी करतात. खासदारांनी जो निधी मंजूर केला. त्याच गोष्टीची माहिती त्यांनी दिली आहे. मंजूर निधीमुळे आमदारांना पोटशूळ उठले आहे अशी टिका प्रकाश म्हात्रे यांनी केली आहे. तर सदानंद थरवळ यांनी सांगितले की, एखाद्या विकास कामासाठी किती पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठी खासदार जी मेहनत घेत आहे ते मंजूर निधीवरुन लक्षात येते. आमदारांच्या पत्रला काही एक किंमत नसते. हे मला माहिती आहे. शहर प्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले की, काम करण्यासाठी सकाळी उठावे लागते अशी टिका राजू पाटील यांच्यावर केली.
मानपाडा रस्त्याकरीता खासदारांनी 27 कोटी रुपये मंजूर करुन आणले. या रस्त्यासाठी मी स्थायी समिती सभापती असताना 33 कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र हा विषय अधिकाऱ्यावर दबाव आणून तत्कालीन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी रोखून धरला होता. आत्ता त्याला मंजूरी मिळाली असता मनसे आमदाराने त्याचे श्रेय घेतले आहे याकडेही रमेश म्हात्रे यांनी लक्ष वेधले.