मुरलीधर भवार-कल्याण: कल्याण-शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविला आहे. थरवळ यांनी पक्षाला अपेक्षित असलेले काम त्यांच्याकडून होत नसल्याने राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे तरी ते शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. मी कुठेही जाणार नसल्याचे थरवळ यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने ठाकरे गटाकडून पक्ष बांधणी करीत अनेकांवर जबाबदारी दिली जात आहे. दुसरीकडे थरवळ यांनी दिलेला राजीनामा दिल्याने तर्कविर्तक व्यक्त केले जात आहेत.
थरवळ हे शिवसेनेत १९८० सालाापासून कार्यरत आहे. शिवसैनिक ते कल्याण लोकसभा जिल्हा प्रमुख असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत ते नगरसेवक होते. शिवसेनेत फूट पडल्यावर ठाकरे आणि शिंदे गट तयार झाले. थरवळ यांनी ठाकरे गटात राहणे पसंत केले. ठाकरे गटाने त्यांच्यावर कल्याण लोकसभा जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. ही जबाबदारी २७ जुलै २०२२ साली दिली गेली होती. वर्षभर ही जबाबदारी त्यांनी संभाळली. पक्ष संघटना वाढीस लावण्याचे प्रयत्न केले. मात्र आत्ता पक्षाला अपेक्षित असलेले काम त्यांच्याकडून होत नसल्याचे कारण देत त्यांनी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. मी शिवसैनिक होतो. शिवसैनिकच राहणार. शिवसैनिक म्हणून पक्षाचे काम करणार. मात्र मी शिंदे गटात जाणार राजकीय चर्चेला काही अर्थ नाही. मी कुठेही जाणार नाही.
लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर थरवळ यांनी राजीनामा दिल्याने पक्ष प्रमुख ठाकरे हे त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होतात की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पक्षाने त्यांचा राजीनामा स्विकारला नाही तर थरवळ काय करणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. थरवळ यांच्या राजीनाम्याविषयी ठाकर गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्या राजीनाम्या विषयी मला काही एक कल्पना नाही.
एकीकडे कल्याण लोकसभेची जागा ठाकरे गटाने प्रतिष्ठेची केली आहे. ती त्यांना जिंकायची आहे असे आवाहनही पक्षाचे प्रमुख ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी झालेल्या पक्षाच्या बैठकीत बोलून दाखविली होती. त्याच कल्याण लोकसभेकरीता नेमलेले जिल्हाध्यक्ष राजीनामा देणार असतील तर पक्षाची पूढील भूमिका काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.