कल्याण-लोकसभेत नारी शक्ती वंदन विेधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचा हा पाठिंबा मांसाहेब मीनाताई ठाकरे यांना समर्पित आहे, अशी माहिती कल्याणचे खासदार खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची माहिती दिली आहे.
कालचा दिवस देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांमध्ये नोंदवला जाईल. लोकसभा आणि राज्यातील विधिमंडळांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या संविधान (१०८ वी सुधारणा) विधेयकाचे म्हणजेच नारी शक्ती वंदन अधिनियमाचे शिवसेना स्वागत करत आहे. आमचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना या विधेयकाला आपला पाठिंबा जाहीर करत आहे. या विधेयकानुसार एसी आणि एसटी यांच्यासाठी आरक्षित केलेल्या जागांपैकी एक तृतीयांश जागाही त्या समाजाच्या महिलांसाठी आरक्षित केल्या आहेत. संसदेच्या नव्या इमारतीत पहिल्याच दिवशी देशातील महिलांसाठी एक नवी सुरुवात झाली आहे. नारी शक्ती वंदन विधेयकामुळे देशातील लोकशाही आणखी मजबूत होणार आहे.
याआधीच्या सरकारांनी महिलांच्या हक्कांविरोधात नेहमीच बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे देशाच्या लोकसंख्येच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त संख्येने असलेल्या महिलांना त्यांचे राजकीय अधिकार मिळालेच नाहीत. आता ‘अमृत काळ’ आहे. या अमृतकाळात देशाच्या जडणघडणीत महिला खूप मोलाची भूमिका बजावतील. विधानसभा, विधान परिषद आणि देशाच्या संसदेत महिलांना आरक्षण मिळाल्यानंतर महिलांचा राजकारणातील आणि राज्यकारभारातील सहभागही लक्षणीय प्रमाणात वाढेल. नव्या संसद भवनात महिलांसाठीच्या नव्या अमृतकाळाची सुरुवात होईल, याची आम्हाला खात्री आहे.
महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय राजकीय-सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्याही क्रांतिकारी आहे. हा निर्णय घेताना आपल्या देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राच्या मातीतून मोलाचं योगदान देणाऱ्या राजमाता जिजामाता भोसले, राणी ताराबाई, पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई या सर्वांच्या स्मृतींना शिवसेना आदरांजली वाहून वंदन करत आहे. हे महिला आरक्षण विधेयक आणण्याचं धाडस आणि धडाडी दाखवल्याबद्दल शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.