मुरलीधर भवार, कल्याण- सिंधुदुर्ग येथील राजकोट येथे उभारण्यात आलेला पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला आज सायंकाळी कल्याण येथून अटक करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जनमानसात संतप्त लाट उसळली. या घटनेनंतर पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. आपटे याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्याच्या दिवसापासून आपटे पसार झाला होता. आपटे याच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध तपास पथके तयार केली होती. घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपटे याच्या कल्याणमधील बाजारपेठ परिसरातील घराला कुलूप होते. त्याच्या घरासमोर संभाजी ब्रिगेड यांनी आंदोलन करून त्याच्या घरावर शिवद्रोही असे लिहिण्याचा त्याचा फोटो चिटकवण्यात आला होता. त्याच्या घरासमोर अंडी फोडून निषेध करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली. आपटे यांच्या विषयी माहिती घेतली होती. तसेच त्याच्या पत्नी त्यांच्या कल्याणमधील घरी परतल्या होत्या.
जयदीप आपटे यांना तात्काळ अटक
पोलीस पथके मागावर होती. बाजारपेठ पोलिसांना आज अशी माहिती मिळाली की, आपटे हा त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्याच्या कल्याणमधील बाजारपेठे येथील घरी येणार आहे. पोलिसांनी आपटेला त्याच्या घरी येतानाच अटक केली आहे. आपटेला अटक करून तात्काळ पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या कार्यालयात हजर केले आहे. पोलिसांकडून त्याची पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.