कल्याण - महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरात साजरी होते. विदेश असलेला मराठी माणूसही आपल्या राजाची जयंती धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरी करतो. राज्यभरात 19 फेब्रुवारी रोजी उत्सवाचं वातावरण असतं. गावागावात महाराजांचे पोवाडे गायले जातात, व्याख्यानं ठेवली जातात. सामाजिक आणि विधायक उपक्रमांनी या उत्सवातून सामाजिक भान जपलं जातं. महाराजांच्या उंचच उंच मूर्तीची पुजा होते, अश्वारुढ पुतळ्यांच मिरवणूकही निघते. तर, अनेक कलाकार आपल्या कलेतून महाराजांची प्रतिमा साकारतात
गेल्या ३६ वर्षाची परंपरा असलेल्या कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिव जयंती उत्सव मंडळाच्या विद्यमाने या वर्षीच्या शिवजयंती निमित्त शिवरायांना वंदन करण्यासाठी 6 हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून शिवप्रतीमेची छबी साकारण्यात आली आहे. तिसगांवातील तिसाई देवी मंदीराच्या प्रांगणात साकारण्यात आलेली ही प्रतिमा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि कलेतून साकारण्यात आली आहे. सध्या या प्रतिमेंचं आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचं सोशल मीडियातून कौतूक होत आहे.
शिव प्रतीमेची ही कलाकृती प्रत्यक्ष कृतीत उतरण्यासाठी रुपेश गायकवाड हे स्वःता गेली महिनाभर आपल्या निवासस्थानी प्रायोगिक पद्धतीने सराव करीत होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून ही कलाकृती तिसाई देवीचरणी समर्पीत करण्यात आली आहे. गतवर्षी प्रमाणे या वर्षीही शिव जयंती उत्सवावर कोवीडचे संकट कायम असल्याने या वर्षीही १९ फेब्रुवारी रोजीच्या शिवजयंती दिनी तिसाई देवीच्या प्रांगणात शिव जयंती उत्सव मंडळाच्यावतीने शिव प्रतिमेचे पुजन होणार आहे. त्यानंतर विविध संस्था संघटनांना वृक्ष रोपांचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात येईल. तसेच, शिवजयंतीच्या दुसऱ्यादिवशी शिव प्रतिमेत वापरण्यात आलेल्या वृक्ष रोपांचेही विविध संस्था संघटनांना वृक्ष वाटप करण्यात येईल.