Eknath Shinde Shiv Sena: डोंबिवली शिवसेनेच्या शहर शाखेत फोटो लावण्यावरुन शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थक एकमेकांमध्ये भिडले. दोघांनी शाखेवर ताबा असल्याचा दावा करीत शाखेत ठाण मांडले. राज्याचे राजकारण तापले असताना एकीकडे शिवसेना कोणाची आहे, असा वाद सुरू आहे. तशातच दोन्ही गटाकांडून शिवसेना आमचीच असा दावा केला जात आहे. दुसरीकडे शाखा ताब्यात घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरु आहेत. डोंबिवली शहर शाखेत त्याचा आज प्रत्यय आला.
डोंबिवलीच्या शिवसेना शाखेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, युवा नेते आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा फोटो होतो. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे समर्थकांनी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो काढला होता. त्यावरून आज दुपारी शाखेत उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना शहर प्रमुख विवेक खामकर आणि अन्य पदाधिकारी बसलेले असताना शिंदे गटातील काही कार्यकर्ते शाखेत आले. शाखेत दोन्ही गट आमने सामने आल्याने त्यांच्या जोरदार वाद झाला.
शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो लावला. गेल्या दोन तासापासून या मुद्यावरुन वाद सुरु आहे. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. आता दोन्ही गट शाखेत ठाण मांडून बसले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शाखेत धाव घेतली आहे. दोन्ही गटामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरु केला आहे. शिवसेनेचे सदानंद थरवळ आणि कविता गावंड हेदेखील शाखेत आहेत.