राज्यात कोरोनाचा आकडा 13 हजारावर गेलेला असताना देखील कल्याणसारख्या ठिकाणी मोठमोठे लग्नसोहळे आयोजित केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्वेत बुधवारी रात्री अशाच एका लग्न सोहळ्यावर पोलिसांनी कारवाई केली. (700 people came in wedding Event at Kalyan, police Registered FIR.)
कल्याण पूर्वेतील 60 फुटी रोड, गॅस कंपनी शेजारी एका लग्न समारंभाला मोठ्या प्रमाणावर लोक आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार 5/ड प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांच्या पथकाने पाहणी केली असता या लग्न सोहळ्याला सुमारे 700 हून अधिक लोक हजर असल्याचे दिसले. एवढ्या लोकांसोबत लग्न सोहळ्याला परवानगी नसताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आहे. यामुळे पोलिसांनी या विवाह सोहळ्याचे आयोजक राजेश यशवंत म्हात्रे, चिंचपाडा, कल्याण पूर्व, महेश कृष्णा राऊत, कासारवडवली, जि. ठाणे यांचे विरुद्ध भा.द.वि. कलम 188, 269, 270, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम51 , तसेच कोविड-19 उपाययोजना नियम 11 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे,तरी अशा परिस्थितीत नागरिकांनी वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना न चुकता मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे (social distancing) या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.