कल्याण-कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा तलावाच्या किनारी आज असंख्य कासव मृतावस्थेत पडलेले मिळून आले. कासवांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. कल्याण पश्चिमेला असलेल्या भव्य गौरीपाडा तलावाचे काही वर्षापूर्वी सुशोभिकरण करण्यात आले होते. या तलावात स्थानिक लोक मासेमारीही करतात. दोन दिवसापूर्वी काही कासव मेलेल्या स्थितीत आढळून आले होते. आज मात्र तलावाच्या किनारी असंख्य कासव मृतावस्थेत पडलेले दिसून आले.
हा प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आला. या ठिकाणी भाजपचे माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी धाव घेतली. या घटनेची माहीती गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनासह प्रदूषण नियंत्रण मंडळास दिली आहे. कासवांचा इतक्या मोठय़ा प्रमाणात मृत्यू झाल्याची बाब धक्कादायक आणि गंभीर आहे. काही कासवांनी मात्र तलावाच्या बाजूला असलेल्या गवाताचा आसरा घेतला होता. तलावात मासेमारी करताना माशांना काही खायला टाकण्यात आले असावे. तेच खाद्य कासवांनीही खाल्ले असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तलावाच्या पाण्यात काही मिसळले गेले असल्याने प्रदूषित पाण्यामुळे कासवांचा मृत्यू झाला असावा अशा विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. कासव हा उभयचर आणि दीर्घायुष्यी आहे. त्याचा अशा प्रकारे मृत्यू होणो ही गंभीर बाब आहे. काही ग्रामस्थांनी मृतावस्थेत पडलेले नेमकी किती कासव आहे. याची मोजणी केली असता त्यांनी सांगितले की, किमान ८५ कासव मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले होते.
काही दिवसांपूर्वी कोरोना काळात गौरीपाडा परिसरात काही पक्षी मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आत्ता कासव मृतावस्थेत पडल्याचे दिसून आल्याने या परिसरातील वन्यजीवांना कशामुळे फटका बसत आहे या विषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत