कल्याण - कल्याण पश्चिमेकडील संतोषी माता रोडवरील मॅक्सी ग्राउंडसमोरील इमारतीत असलेल्या एका महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात छापा टाकण्यात आला आहे. वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरो आणि वन विभाग कल्याण शाखेने हा छापा टाकला आहे. या छाप्यात 250 इंद्रजाल (काळा समुद्री शैवाळ) आणि 80 जोडी घोरपडीचे अवयव जप्त करण्यात आले आहेत.
वनविभागाकडून वास्तू सल्लागार महिलेसह त्याच्या कार्यालयातील कर्मचारी नवनाथ घुगे आणि अक्षय देशमुख अशा तिघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव घरात, कार्यालयात, दुकानात ठेवल्यास सुखशांती आरोग्य आणि लक्ष्मी घरात नांदते, या अंधश्रद्धेपोटी या वस्तू बाळगल्या जातात. काळी जादू करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. आयुर्वेदिक औषधा मध्ये देखील या वस्तू वापरल्या जातात मात्र या वस्तू जवळ बाळगण्यास किंवा त्यांची विक्री करण्यास वन्यजीव कायदा 1972 अन्वये मज्जाव करण्यात आला आहे. वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरो विभागीय उपसंचालक योगेश वारकड, गजेंद्र हिरे, आणि वन विभागाचे आर. एन. चन्ने आणि पथकाने ही धाड टाकत ही कारवाई केली.
पथकाने मुद्देमालासह तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीसकोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या वस्तू जवळ बाळगण्यास कायद्याने बंदी असतानाही इतक्या मोठया प्रमाणावर या वस्तूचा साठा का करण्यात आला होता? याची चौकशी सुरु आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर या वस्तू कोणी आणि कोणत्या ठिकाणाहून उपलब्ध करून दिल्या हेदेखील एक कोडच आहे.